BGT 2024-25 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रोहितच्या खेळण्याबाबत संदिग्धता, जाणून घ्या ‘या’मागचे कारण….

Border-Gavaskar Trophy 2024-25 :- बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून पहिल्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यामध्ये रोहित शर्मा खेळण्याबाबत संधिग्धता आहे. वैयक्तिक कारणांमुळे रोहित शर्मा लढत खेळू शकणार नसल्याचे रोहित शर्माने (Rohit Sharma) बीसीसीआयला कळविले आहे.
भारत पर्थ येथून खडतर दौऱ्याची सुरुवात करणार आहे. त्यानंतर दुसरी लढत कॅनबेरा येथे होणार आहे. रोहितने पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटीतून माघार का घेतली याबाबत स्पष्टता नसली तरी, सुरुवातीच्या दोन पैकी एका कसोटीसाठी तो उपलब्ध नसेल, असे सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितले आहे.
रोहित शर्माने नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत कर्णधारपद भूषविताना मालिका 2-0 अशी जिंकली होती. यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीसाठी देखील तो उपलब्ध असणार आहे. मात्र, बॉर्डर-गावस्कर मालिकेतील लढतीमध्ये खेळला नाही, तर त्याची जागी अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी अभिमन्यू हा भारत-अ संघासह ऑस्ट्रेलियामध्येच असणार आहे.
ईश्वरनच्या अनुभवी फलंदाज व यष्टिरक्षक असलेला के. एल. राहुल यांना देखील रोहितच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शुभमन गिल, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह किंवा यष्टिरक्षक ऋषभ पंत यांना कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळावी लागेल.





