मेलबर्न – भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला गोलंदाजीत अव्वल स्थानी आहे. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेच्या पहिल्या कसोटीत देखील त्याने नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये संघाचे नेतृत्व करताना विजय मिळविला. या लढतीत बुमराहने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात ३ गडी बाद करताना सामानावीराचा सन्मान देखील मिळविला. कसोटी संघाचा उपकर्णधार असलेला जसप्रीत बुमराह भारतासाठी सातत्याने बळी मिळावीत आहे. बुमराहची ऍक्शन व त्याच्याकडील कौशल्ये हे त्याला भेदक गोलंदाज बनवितात, असे मत ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाज स्टीव्हन स्मिथने बोलताना सांगितले.
बुमराहचा रनअप असेल, किंवा त्याची गोलंदाजीची शैली ही इतर गोलंदाजापेक्षा वेगळी आहे. तो त्याच्या रनअपची सुरुवातच वेगळ्या पद्धतीने करतो. धावताना देखील त्याची पद्धत वेगळी असते. उडी मारून चेंडू सोडताना देखील त्याची वेगळीच शैली दिसून येते. यापूर्वी देखील मी त्याचा अनेकादा सामना केला आहे. प्रत्येक वेळेस त्याच्या विरुद्ध खेळताना खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी जास्त वेळ लागतो, असे स्टीव्हन स्मिथने सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना सांगितले. बॉर्डर गावस्कर मालिकेच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात बुमराहने स्मिथला बाद केले होते. स्टीव्हन स्मिथला कसोटी क्रिकेटमध्ये ‘गोल्डन डक’वर बाद करणारा जसप्रीत बुमराह जगातील दुसरा तर भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराहच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन ही कामगिरी केली होती.
स्मिथ पुढे म्हणाला, बुमराह तुमच्या अगदी जवळ येऊन चेंडू सोडतो. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीतील लाईन आणि लेंथ समजण्यासाठी फलंदाजांना मर्यादा येतात. याशिवाय त्याच्याकडे चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची क्षमता आहे. त्याच्याकडे रिव्हर्स स्विंग, स्लो बॉल, बाउन्सर, अशा सगळ्या प्रकारचे चेंडू टाकण्यात तो पटाईत आहे. त्याच्या वेगवान गोलंदाजाकडे आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात असल्यानेच तो गोलंदाज म्हणून परिपूर्ण असल्याचे स्मिथ म्हणाला.
IND vs AUS 2nd Test : के.एल. राहुलने सलामीलाच खेळावे – चेतेश्वर पुजारा
तो टर्मिनेटर आहे – डॅमियन फ्लेमिंग
बुमराहला त्याच्यातील बलस्थाने माहिती आहेत आणि तो फलंदाजांचा कमकुवतपणा शोधण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. त्याचा रनअप खूप मोठा नाही. मात्र, तो हुशारीने गोलंदाजी करताना फलंदाजांना अचूकतेने बाद करतो. म्हणूनच तो टर्मिनेटर आहे, असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डॅमियन फ्लेमिंग म्हणाला. बुमराहकडून येणारा चेंडू एक तर हळू असतो अथवा वेगवान यॉर्कर असतो. त्याच्याकडे अनेक कौशल्ये आहेत. तुमच्यकडे कौशल्ये असतील तर तुमच्याकडे गोलंदाजीत अधिक पर्याय असतात, असे फ्लेमिंग बोलताना म्हणाला.