राष्ट्र निर्मितीसाठी ग्रंथमहोत्सव महत्त्वाचे साधन – उपमुख्यमंत्री फडणवीस

पुणे – पुस्तकातून व्यक्तिमत्व, विचार घडविण्यासोबतच ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. पुस्तके ही समाजाबद्दलच्या भावना निर्माण करत असतात. आपल्या राष्ट्राच्या खजिन्यात संपत्तीपेक्षा विचारांचा खजिना किती हे देखील पाहणे महत्वाचे असते. ज्ञान आपल्यापुरत मर्यादित न ठेवता ती पुढच्या पिढीपंर्यंत नेण्याची व्यवस्था करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ग्रंथमहोत्सव आहे. हा ग्रंथमहोत्सव समाजाच्या, राष्टाच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे साधन आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या वतीने आयोजित पुस्तक महोत्सवाला फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.२२) भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुनील कांबळे, राहुल कुल, श्रीकांत भारतीय, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, संयोजक राजेश पांडे उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, हल्ली तरुणाईचा स्क्रीन टाइम वाढल्याचा प्रकार समोर आला असताना पुस्तक महोत्सवाला मिळणारा तरुणांचा प्रतिसाद हा अभिनंदनीय आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असून पुस्तक प्रदर्शनासाठी पुण्यापेक्षा उत्तम जागा असूच शकत नाही. मलिक म्हणाले, दिल्ली वगळता एवढा मोठा पुस्तक महोत्सव कुठेच होत नाही. महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाने चांगेल सहकार्य केले. लोकसहभागातून भव्य आयोजन शक्य होते हे पुण्याने दाखवून दिले.
राज्य शासन मदत करेल
पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीला चालना देऊन विचार, संस्कृती आणि विज्ञान शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता येईल म्हणून राष्ट्रीय पुस्तक न्यासाने राज्यात विभागनिहाय पुस्तक महोत्सव आयोजित करावा. राज्य शासन अशा महोत्सवांना नक्कीच सहकार्य करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.





