‘सुप्रीम’ निर्णयाने प्रचारासाठी ‘बोनस’ वेळ

वडगावशेरी –“पावसाबाबत आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करा,’ असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. पुण्यातील पावसाची स्थिती पाहता, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, “स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल समाधानकारक आहे. आता उमेदवारांनाही हा मधला काळ प्रचारासाठी “बोनस’ मिळणार आहे, असे मत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या जोरावरच महापालिकेचा आखाडा मारूनच दाखवू,’ असे मत या नेत्यांनी “प्रभात’शी बोलताना व्यक्त केले आहे.
ओबीसी आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. मात्र, याबाबत कोणीही बोलत नाही. शासनाने या पुढील काळात ओबीसी समाजाच्या बाबतीत निर्णय घेताना विचार करण्याची गरज आहे. अन्यथा समाजात नाराजी वाढेल.
– रोहन सुरवसे पाटील,
प्रदेश सरचिटणीस, युवक कॉंग्रेस
निवडणुका पुढे गेल्या, तरी त्याचा फायदा सर्वांनाच आहे. त्यामुळे एकट्या सरकारवर खापर फोडणे योग्य होणार नाही. ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनीच संघटित होण्याची आवश्यकता आहे. तरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
– बाळासाहेब सातव पाटील,
उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
पावसाची स्थिती पाहून निवडणुका घेण्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, असा न्यायालयाचा आदेश आहे. निवडणुका कधीही झाल्या, तरी राष्ट्रवादी नेहमीच सज्ज आहे. ही बाब लक्षात घेऊन आरोप करणे टाळले पाहिजे.
– उषा कळमकर,
माजी नगरसेवक
सर्व घटकांना न्याय मिळावा, अशी आमची भूमिका आहे. निवडणुका येत असतात आणि जात असतात. मात्र त्यातून समाज संघटीत झाला पाहिजे. ही भूमिका सर्वांनीच घेण्याची गरज आहे. तरच यातून सामाजिक बंधूभाव निर्माण होणार आहे.
– राजेंद्र सातव पाटील,
माजी उपसरपंच, वाघोली
राजकारणापेक्षा समाजकारण करा, हा मंत्र आम्हाला मिळाला आहे. त्यानुसार संघटनेचे कार्य सुरू आहे. निवडणुका लांबणीवर गेल्याची काळजी आम्हाला नाही. याउलट काळात आम्ही अधिक ताकदीने लढण्यास तयार आहोत.
– प्रसाद जठार, युवा सेना प्रमुख, वडगाव शेरी





