Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! हायकोर्टानं ‘ती’ याचिका फेटाळली

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठे यश मिळाले होते. त्यांनी २१ जागा लढवल्या होत्या. त्यामधील ९ ठिकाणी त्यांना विजय मिळाला होता. पण विधानसभेला ठाकरे गटासह महाविकास आघाडी मोठा धक्का बसला. या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे फक्त २० आमदार निवडून आले. यानंतर आता उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
काय घडले नेमके?
सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेवर ठाकरे आणि शिंदे गटात कांटे की टक्कर बघायला मिळाली होती. या चुरशीच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी पराभवाचा धक्का दिला होता. वायकरांनी अवघ्या ४८ मतांनी ही निवडणूक जिंकली होती. पण या निवडणूक निकालावर अमोल किर्तीकर यांनी आक्षेप घेतला होता. मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप अमोल कीर्तिकरांकडून करण्यात आला.
यानंतर त्यांनी रवींद्र वायकर यांची खासदारकी रद्द करण्याबाबतची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली. आता यावर न्यायालयाने निकाल दिला असून कोर्टाने अमोल किर्तीकर यांची याचिका फेटाळून लावली आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.





