एफ. सी. रोडवर बॉम्ब ब्लास्ट मॉक ड्रिल; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

पुणे : डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एफ.सी. रोड परिसरात आज आपत्कालीन परिस्थितीचा सराव म्हणून बॉम्ब ब्लास्ट मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले. या सरावाचे उद्दिष्ट म्हणजे नागरिक व प्रशासनाने अशा गंभीर प्रसंगात तत्काळ कसे प्रतिसाद द्यायचे याचा अनुभव घेणे होते
पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले की, “हा ब्लास्ट खरा नसून पोलिसांची नियोजित Exercise Drill आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये व अफवांवर विश्वास ठेवू नये.”
या मॉक ड्रिलदरम्यान बॉम्बस्फोटाचे काल्पनिक दृश्य निर्माण करण्यात आले. त्यानंतर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक, बॉम्ब शोध पथक, अग्निशामक दल व वैद्यकीय पथकांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्याची प्रात्यक्षिके दाखवली. परिसर त्वरित सील करून वाहतूक व्यवस्थापनही करण्यात आले.
डॉ. भाजीभाकरे यांनी पुढे सांगितले की, “आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी शांतता व संयम बाळगणे, पोलीसांच्या सूचनांचे पालन करणे आणि अफवांवर विश्वास न ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या सरावाचे मूळ उद्दिष्ट म्हणजे पोलिसांच्या तयारीची चाचणी घेणे आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.”
प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अशा मॉक ड्रिलच्या वेळी सहकार्य करावे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचनांचे काटेकोर पालन करावे.

