Reema Lagoo : बॉलिवूडची लाडकी ‘आई’; मृत्यूच्या काही तास अगोदर अभिनयातच गुंतली होती; 2017 मध्ये घेतली अकाली एक्सिट
Reema Lagoo : ही गोष्ट त्यांचे चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येते. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले.

Reema Lagoo : कोणत्याही चित्रपटात सहायक कलाकार अनेकदा मुख्य कलाकारांइतकाच प्रभाव टाकत असतात. यामुळेच त्यांच्या अभिनयाची दखल घेतली जाते. आजपर्यंत असे अनेक नामांकित सहायक कलाकार मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीला लाभले आहेत. ज्यांची दखल घेणे अनिवार्य ठरते. त्यापैकी एक म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू.
मराठी चित्रपटांसह हिंदी देखील त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात त्यांनी काम केले आहे. त्यांचा स्क्रिन प्रेझेन्स कमालीचा मानला जातो. ही गोष्ट त्यांचे चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येते. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले.
‘खानदान’मधून छोट्या पडद्यावर एंन्ट्री
21 जून 1958 रोजी मुंबईत जन्मलेल्या रिमा लागू यांचे खरे नाव नयन भडभडे होते. त्यांची आई मंदाकिनी भडभडे या प्रसिद्ध मराठी रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. कला क्षेत्रातील वारसा घेऊन रिमा यांनीही मराठी रंगभूमीवरून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दूरदर्शन मालिकांकडे वळत 1985 मध्ये ‘खानदान’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर त्यांना ‘तू तू मैं मैं’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘किरदार’, ‘नूपुर’ आणि ‘नामकरण’ यांसारख्या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि याच मालिकांमुळे त्या घराघरात पोहचल्या.
हेही वाचा : Iran Us Talks: अमेरिका-इराण करार होणार अंतिम? ; गालिबाफ यांनी मिनाब हल्ल्याची करून दिली आठवण
अभिनयासाठी सोडली बँकेतली नोकरी
बॅालिवूडमध्ये रिमा लागू यांनी ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात जुही चावलाच्या आईची भूमिका साकारली. मात्र त्यांना खरी लोकप्रियता सलमान खानच्या चित्रपटातील आईच्या भूमिकेतून मिळाली. ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘साजन’, ‘जुडवा’ आणि ‘पत्थर के फूल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली. विशेष म्हणजे, अभिनयासाठी रिमा यांनी तब्बल 10 वर्षे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये लिपिकाची नोकरी सोडत कायमस्वरुमी अभिनय करण्याचा मोठा निर्णय घेतला.
गुमराह चित्रपटाचा किस्सा
बॉलिवूडमधील‘ऑन-स्क्रीन आई’ म्हणून रिमा लागू ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली. 1993 मध्ये महेश भट्ट दिग्दर्शित आणि यश जोहर निर्मित ‘गुमराह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रिमा लागू यांनी श्रीदेवीच्या आईची भूमिका साकारली होती. चित्रपटातील रिमा लागू यांचा अभिनय पाहून श्रीदेवी असुरक्षित झाल्या आणि श्रीदेवीने रिमा लागू यांची काही सीन्स काढून टाकले होते, अशी चर्चा आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अनेक सुपरहिट चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रिमा लागू यांचे 18 मे 2017 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत शूटिंग करत होत्या. संध्याकाळी त्या घरी परतल्या आणि मध्यरात्री त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा : Sanjay Raut : बंडखोर खासदार ठाकरे गटात जाणार? राऊतांच्या विधानामुळे संकेत, अमित शाहांच नाव घेत म्हणाले…




