Ankita Walawalkar : नीट बघाल, त्यांचा पाय कुठे अडखळू नये.! कान्सच्या रेड कार्पेटवर नेमकं काय घडलं? कोकण हार्टेड गर्ल अशोक सराफ यांच्या बद्दल काय म्हणाली
१७ मे रोजी पार पडलेल्या रेड कार्पेट वॉकमध्ये सर्व कलाकारांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख परिधान करून विशेष लक्ष वेधून घेतले.

Ankita Walawalkar : जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सव मध्ये यंदा मराठी मनोरंजन विश्वाची दमदार उपस्थिती पाहायला मिळाली. फ्रान्समधील कान्स येथे रंगलेल्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासह पहिल्यांदाच रेड कार्पेटवर हजेरी लावली.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा क्षण अत्यंत अभिमानास्पद मानला जात असून सोशल मीडियावरही या ऐतिहासिक उपस्थितीची जोरदार चर्चा रंगली आहे. यंदाच्या कान्स महोत्सवात मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी एकत्र येत जागतिक व्यासपीठावर मराठी संस्कृतीची छाप उमटवली.
या प्रतिनिधी मंडळात अभिनेत्री प्राजक्ता माळी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालवलकर, पॉडकास्टर जयंती वाघधारे तसेच निर्माते केदार जोशी यांचा समावेश होता. या सर्वांनी ‘इंडियन पॅव्हेलियन’शी संबंधित विविध सांस्कृतिक आणि चित्रपटविषयक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत मराठी मातीचा गौरव वाढवला.
‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या अंकिता वालावलकरने या अनुभवाबद्दल भावना व्यक्त करत खास पोस्ट शेअर केली. तिने रेड कार्पेटवरील काही आकर्षक छायाचित्रे इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मागील सहा दिवसांचा अनुभव तिच्यासाठी अविस्मरणीय असल्याचे सांगितले.
“मागचे सहा दिवस मी अशोक सर आणि निवेदिता मॅम यांच्यासोबत घालवले, माझ्यासाठी हाच खरा रेड कार्पेट होता,” असे भावनिक शब्द तिने पोस्टमध्ये लिहिले. तिच्या या पोस्टला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून मराठी कलाकारांविषयीचा अभिमान व्यक्त केला जात आहे.
अंकिता वालावालकर काय म्हणाली?
मागचे ६ दिवस मी Ashok Sir आणि Nivedita Mam यांच्यासोबत घालवले. मस्ती, मजा, एकत्र breakfast, एकत्र dinner…माझ्यासाठी हाच खरा red carpet होता. ज्या माणसांना महाराष्ट्र मनापासून पूजतो, अशा व्यक्तींसोबत इतका वेळ घालवायला मिळणं, त्यांच्याकडून शिकायला मिळणं… यापेक्षा मोठं भाग्य अजून काय असू शकतं?
एक उत्तम बायको, एक समजूतदार साथीदार आणि एक सुंदर माणूस कसं असावं…हे मी Nivedita Mam यांना पाहून शिकले …मोठेपणा प्रसिद्धीत नसतो, तर आपल्या माणसांना जपण्यात असतो…आणि ते त्यांच्याकडे मनापासून आहे.
रेड कार्पेट चा व्हीडीओ त्यांचा नीट बघाल तर जाणवेल की अशोक सरांचा हाथ पकडून त्यांचा पाय कुठे अडखळू नये हे बघत त्यांनी walk केलाय…त्यांच्यातली शांतता, आपुलकी, काळजी, आणि कायम सोबत उभं राहण्याची पद्धत खूप काही शिकवून गेली. खरंच… मी धन्य झाले, असे अंकिता वालावालकरने म्हटले आहे.
१७ मे रोजी पार पडलेल्या रेड कार्पेट वॉकमध्ये सर्व कलाकारांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख परिधान करून विशेष लक्ष वेधून घेतले. मराठमोळ्या संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या या पोशाखांमुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांचेही लक्ष वेधले गेले.
विशेषतः अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या पारंपरिक पण आकर्षक लूकची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अनेक चाहत्यांनी “मराठी संस्कृतीचा जागतिक मंचावर दिमाख” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने ही उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे.





