Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान.! हेमा मालिनी यांना अश्रू अनावर
भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना 25 मे रोजी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Padam Vibhushan | Dharmendra : भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना 25 मे रोजी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या या पुरस्काराचा स्वीकार त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन केला. या भावनिक क्षणाला त्यांची मुलगी अहाना देओल देखील उपस्थित होती.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना हेमा मालिनी अत्यंत भावूक झालेल्या दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर धर्मेंद्र यांच्या आठवणींची वेदना स्पष्ट जाणवत होती.
समारंभापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना हेमा मालिनी यांनी सांगितले की, त्यांची दुसरी मुलगी इशा देओल हिलाही या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे होते. मात्र काही कारणांमुळे ती राष्ट्रपती भवनात पोहोचू शकली नाही.
हा क्षण संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा आणि तितकाच भावनिक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच धर्मेंद्र यांना मिळालेल्या या सन्मानाची माहिती सनी देओल आणि बॉबी देओल यांनाही असल्याचे त्यांनी नमूद केले.
सहा दशकांची गौरवशाली कारकीर्द !
धर्मेंद्र यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत जवळपास सहा दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. दमदार अभिनय, संवादफेक आणि साधेपणामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.
त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये शोले, फूल और पत्थर, बंदिनी, सीता और गीता, मेरा गाव मेरा देश आणि हकीकत यांसारख्या चित्रपटांचा समावेश होतो.
1960 साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून धर्मेंद्र यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आयुष्याच्या अखेरच्या काळापर्यंत ते अभिनय क्षेत्रात सक्रिय होते.
त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झालेला इक्कीसहा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. आज धर्मेंद्र आपल्यात नसले तरी त्यांच्या अभिनयाची जादू, साधेपणा आणि अजरामर भूमिका कायम चाहत्यांच्या स्मरणात राहतील.
दोन टप्प्यात पुरस्कारांचे वितरण :
यंदाच्या पद्म पुरस्कार वितरण दोन टप्प्यांत होत असून, आजच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील 66 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये दोन पद्मविभूषण, सहा पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
यंदाच्या पद्म पुरस्कार यादीत एकूण 131 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
एकूण पुरस्कारार्थींमध्ये 19 महिला असून, 16 मान्यवरांना मरणोत्तर सन्मान जाहीर करण्यात आला आहे.





