Sana Saeed: शाहरुखच्या ऑनस्क्रीन लेकीचा धक्कादायक खुलासा; सहा वर्षे बुलिमियाशी केली झुंज
Sana Saeed एका मुलाखतीत सना सईदने सांगितले की, लहान वयापासूनच तिला खाण्याशी संबंधित समस्या जाणवत होत्या. मात्र, हा एक मानसिक आजार आहे, याची तिला कल्पनाच नव्हती. तिला वाटायचे की ही फक्त तिची एक वाईट सवय आहे. त्यामुळे ती स्वतःलाच दोष देत असे आणि याबद्दल तिला खूप लाजही वाटत होती.

Sana Saeed: ‘कुछ कुछ होता है’ या सुपरहिट चित्रपटातून छोट्या अंजलीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सना सईद सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल खुलासा केला. अनेक वर्षे ती बुलिमिया (Bulimia) या खाण्याशी संबंधित मानसिक विकाराचा सामना करत होती. तब्बल सहा वर्षे तिला नेमका कोणता आजार झाला आहे, हेच माहिती नव्हते. मात्र योग्य वेळी आजाराचे निदान झाले, उपचार सुरू झाले आणि चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर ती पूर्णपणे बरी झाली. (Sana Saeed)
एका मुलाखतीत सना सईदने सांगितले की, लहान वयापासूनच तिला खाण्याशी संबंधित समस्या जाणवत होत्या. मात्र, हा एक मानसिक आजार आहे, याची तिला कल्पनाच नव्हती. तिला वाटायचे की ही फक्त तिची एक वाईट सवय आहे. त्यामुळे ती स्वतःलाच दोष देत असे आणि याबद्दल तिला खूप लाजही वाटत होती. (Sana Saeed)
सना म्हणाली, “जवळपास सहा वर्षे मला नेमकं काय होत आहे, हे समजत नव्हतं. या आजाराचं नाव काय आहे, हेही मला माहिती नव्हतं. मी त्यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करत होते. एकदा एका पुस्तकात या आजाराबद्दल वाचलं आणि तेव्हा पहिल्यांदाच मला समजलं की, मी बुलिमियाचा सामना करत आहे. त्यानंतर मी उपचार सुरू केले. पूर्णपणे बरे होण्यासाठी मला आणखी चार वर्षे लागली.” (Sana Saeed)

Sana Saeed
बुलिमिया म्हणजे काय? (Sana Saeed)
बुलिमिया हा खाण्याशी संबंधित मानसिक विकार आहे. या आजारामध्ये व्यक्ती एकावेळी खूप जास्त अन्न खाते आणि त्यानंतर वजन वाढू नये म्हणून विविध मार्गांचा अवलंब करते. काही जण मुद्दाम उलटी करतात, काही जण उपाशी राहतात, तर काहीजण अतिव्यायाम किंवा इतर चुकीच्या पद्धती वापरतात. हा फक्त शारीरिक नाही, तर मानसिक आरोग्याशीही संबंधित गंभीर आजार मानला जातो.
सनाने तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षणही सांगितला. ती म्हणाली, “एक दिवस मला जाणवलं की, मी या आजारासोबत संपूर्ण आयुष्य जगू शकत नाही. भविष्यात माझं लग्न झालं, मी माझ्या जोडीदाराबरोबर बाहेर गेले, तरी मी त्या क्षणांचा आनंद घेऊ शकणार नाही. माझं संपूर्ण लक्ष अन्नावरच असेल. पुढे मला मुलं झाली, तर हा त्रास त्यांच्यापर्यंत पोहोचू नये, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे मी पूर्णपणे बरी होण्याचा निर्धार केला.”
कॉलेजच्या दिवसांबद्दल बोलताना सना म्हणाली की, त्या काळात तिच्या अनेक मैत्रिणी सतत डाएट करत असत. वजन कमी करणे आणि बारीक दिसणे यालाच महत्त्व दिले जात होते. सोशल मीडियावर आणि इंटरनेटवरही विविध डाएट प्लॅनची चर्चा होती. मात्र, निरोगी राहणे, योग्य आहार घेणे आणि शरीर तंदुरुस्त ठेवणे याबद्दल फारसे कोणी बोलत नव्हते.
तिने पुढे सांगितले की, मनोरंजन क्षेत्रात दिसण्याला खूप महत्त्व दिले जाते. त्यामुळे अनेक कलाकारांवर बारीक दिसण्याचा दबाव असतो. अशा वातावरणाचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असेही तिने स्पष्ट केले.
आज मात्र सना सईद पूर्णपणे बरी झाली आहे. ती म्हणाली, “जर माझा अनुभव ऐकून या आजाराचा सामना करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला आपण एकटे नाही आहोत, असे वाटले, तर मी ही गोष्ट सार्वजनिकपणे सांगण्याचा उद्देश सफल झाला असे मला वाटेल.”
सना सईदला ‘कुछ कुछ होता है’मधील छोट्या अंजलीच्या भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तिने ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘बादल’, ‘स्टुडंट ऑफ द इअर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. सध्या ती अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे आपल्या पतीसोबत राहत असून दोघे मिळून प्रॉडक्शन कंपनी चालवत आहेत.





