R. Madhavan On Dia Mirza: ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण! ‘मॅडी’ आणि दिया मिर्झाने मानले आभार
R. Madhavan On Dia Mirza: दिया मिर्झा आणि आर. माधवन यांच्या करिअरसाठी हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा ठरला.

R. Madhavan On Dia Mirza: बॉलीवूड अभिनेता आर. माधवनची प्रमुख भूमिका असलेला ‘रहना है तेरे दिल में’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाने बऱ्याच वर्षांनंतरही लोकांच्या मनात आपले विशेष स्थान टिकवून ठेवले आहे.
यानिमित्ताने आर. माधवनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, “नमस्कार, ‘रहना है तेरे दिल में’ या सिनेमाला प्रदर्शित होऊन २५ वर्षे झाली, यावर विश्वासच बसत नाही. कारण, अजूनही सिनेमातील माधव शास्त्री माझ्यामध्ये मोठ्या अभिमानाने जगत आहे. पण २५ वर्षे झाली, याची मला जाणीव आहे. या सिनेमातील गाणी आजही विविध ठिकाणी वाजतात. मग तो क्लब असो किंवा पार्टी असो, लोक या सिनेमातील गाणी लावतात आणि त्यावर नाचतात.”
“इतकेच नाही तर सिनेमातील पात्रांची नावेही लक्षात ठेवतात. दिया मिर्झा आणि मी, आम्ही दोघांनी सिनेमात अभिनय केला होता. सिनेमातील आमच्या जोडीला लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले, आजही आमची त्या सिनेमातील जोडी प्रेक्षकांना आवडते. ‘रहना है तेरे दिल में’चे दिग्दर्शक गौतम मेनन हे दाक्षिण भारतातील आहेत. त्यांच्याबरोबर हाच सिनेमा मी तमिळमध्ये केला होता.”
View this post on Instagram
“संगीतकार म्हणून हॅरिस जयराज यांनी काम केले होते. आमच्या सगळ्यांसाठीच हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. खरचं विश्वास बसत नाही की सिनेमाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. इतक्या सगळ्या प्रेमासाठी मी सर्वांचा आभारी आहे. हा सिनेमा म्हणजे माझ्यासाठी एक शुभ सुरूवात होती. त्यासाठी मी सगळ्यांचा कृतज्ञ आहे,” असे म्हणत त्याने चाहत्यांचेही आभार मानले.
दिया मिर्झानेही चित्रपटाच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा
अभिनेत्री दिया मिर्झानेही चित्रपटाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. आणि प्रेक्षकांकडून मिळालेल्या या अफाट प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. दियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये चित्रपटातील काही खास सीन्स, आर. माधवनसोबतचे काही फोटो आणि शूटिंगदरम्यानच्या आठवणी पाहायला मिळत आहे.
या पोस्टद्वारे तिने या चित्रपटाशी जोडलेल्या आठवणी तिच्यासाठी अत्यंत खास असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, ‘रहना है तेरे दिल में’ मधील ‘झरा झरा’ आणि ‘सच कह रहा है दीवाना’ सारखी गाणी आजही लोकांना या चित्रपटाची आठवण करून देतात. चित्रपटातील रोमँटिक सीन्स आणि डायलॉग्स आजही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.
दिया मिर्झा आणि आर. माधवन यांच्या करिअरसाठी हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा ठरला. या चित्रपटामुळे दोघांना मोठी लोकप्रियता मिळाली. तर आर. माधवनला यातील भूमिकेमुळेच ‘मॅडी’ ही ओळख मिळाली.
हेही वाचा:
Actress Death : बॉलिवूडवर शोककळा ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन





