Munnabhai-3 : संजय दत्त आणि अर्शद वारसीची जोडी पुन्हा एकत्र; ‘मुन्नाभाई 3’ची अपडेट समोर
Munnabhai-3 : तिसऱ्या भागातूनही प्रेक्षकांना मोठी अपेक्षा

Munnabhai-3 अभिनेता संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची जोडी असलेला ‘मुन्नाभाई’ चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे. ‘मुन्नाभाई’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची अपडेट आता समोर आली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला २०२७ मध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे.
एका वृत्तानुसार, ‘मुन्नाभाई ३’च्या स्क्रीनप्लेची जबाबदारी फरहाद सामजी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू असून, ती शब्दबद्ध केली जात आहे. स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतरच या प्रोजेक्टबाबतच्या पुढील गोष्टी स्पष्ट होतील.
फरहाद सामजी यांचा या फ्रँचायझीशी आधीपासूनच संबंध आहे. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या पहिल्या चित्रपटातील ‘एम बोले तो’ या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी त्यांनी लिहिल्या होत्या. आता याच फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाच्या स्क्रीनप्लेची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
‘मुन्नाभाई ३’बाबत दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी जून २०२६ मध्येही भाष्य केले होते. हा चित्रपट नक्कीच बनणार असून, आता तो बनवण्याची योग्य वेळ आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या या विधानामुळे अनेक वर्षांपासून मुन्ना आणि सर्किटला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांच्या आशा वाढल्या होत्या.
या फ्रँचायझीचा पहिला चित्रपट ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या फ्रँचायझीचा दुसरा चित्रपट ‘लगे रहो मुन्नाभाई’ २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांमध्ये मुन्नाभाई आणि त्याचा मित्र सर्किट यांची धमाल जोडी पाहायला मिळाली होती. संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्या या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे आता तिसऱ्या भागातूनही प्रेक्षकांना मोठी अपेक्षा आहे.
हेही वाचा:
Scene Movie : सूर्याच्या ‘सीन’ची रिलीज होताच हवा! चाहत्यांचं जंगी सेलिब्रेशन, व्हिडिओ तुफान व्हायरल





