Kriti Sanon : “अनेक भूमिका नंतर स्टारकिड्सना दिल्या”; कृती सेनॉनचे इंडस्ट्रीतील नेपोटिझमवर भाष्य
Kriti Sanon : कृती लवकरच 'कॉकटेल २' या चित्रपटात दिसणार आहे.

Kriti Sanon : बॉलिवूडमध्ये आपल्या मेहनतीच्या आणि दमदार अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कृती सेनॉन आज इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतेच कृतीने ‘नेपोटिझम’वर (घराणेशाही) आपली बाजू परखडपणे मांडली आहे.
एका मुलाखतीदरम्यान, कृतीने तिच्या फिल्मी प्रवासातील चढ-उतारांविषयी भाष्य केले. “सिनेसृष्टीची पार्श्वभूमी नसलेल्या कलाकारांना इंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी खूप कष्टाचा सामना करावा लागतो, करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेकदा केवळ स्टारकिड्सना संधी देण्यासाठी तिला चित्रपटांतून बाहेर काढण्यात आले होते,” असा खुलासा तिने केला.
ती पुढे म्हणाली, “जेव्हा तुम्ही फिल्मी बॅकग्राउंडमधून येत नाही, तेव्हा तुम्हाला नेहमीच पुढे काम मिळेल की नाही याची भीती वाटते. मी हळूहळू पुढे जात काही धोके पत्करले आणि विचारपूर्वक निर्णय घेतले. मला ज्या काही संधी मिळाल्या आहेत, त्या मी माझ्या मेहनतीने मिळवल्या आहेत.
मला काहीही सहजासहजी मिळालेले नाही. मी अनेकदा निराश झाले होते. मला वाटायचे की मी अजून चांगले काम करू शकते, पण मला तसे चित्रपट आणि संधी मिळत नव्हत्या. अशा अनेक भूमिका होत्या, ज्यांच्या मी खूप जवळ पोहोचले होते, पण नंतर त्या स्टारकिड्सना देण्यात आल्या. ही गोष्ट माझ्या नियंत्रणाबाहेर होती.” Kriti Sanon
अनेकदा अपयश तुम्हाला यशापेक्षा जास्त शिकवते
कृती म्हणाली, “माझ्या करिअरमध्ये असेही काही टप्पे आले जेव्हा मी खूप गोंधळलेली होते. मला काय बरोबर आणि काय चुकीचे हे समजत नव्हते. मी असे काही चित्रपट साईन केले जे माझ्यासाठी फायदेशीर ठरले नाहीत. त्यावेळी काहीच काम करत नाहीये असे वाटत होते. आज मागे वळून पाहताना वाटते की त्या कठीण दिवसांनी मला खूप काही शिकवले. अनेकदा अपयश तुम्हाला यशापेक्षा जास्त शिकवते.”
मुलाखतीदरम्यान कृतीने फिल्म इंडस्ट्रीतील महिला आणि पुरुषांमधील भेदभावावरही भाष्य केले. ती म्हणाली, “आजही इंडस्ट्रीत पुरुष कलाकारांना जास्त महत्त्व दिले जाते आणि महिलांना बरोबरी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. करिअरच्या सुरुवातीला मी प्रत्येक गोष्ट उघडपणे बोलू शकत नव्हते, पण काळानुसार मी स्वतःसाठी आवाज उठवायला शिकले.”
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कृती लवकरच ‘कॉकटेल २’ या चित्रपटात दिसणार आहे. शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, हा चित्रपट १९ जून २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. Kriti Sanon
हेही वाचा :






