Huma Qureshi: हुमा कुरेशीचा प्रेरणादायी प्रवास; जाहिरातींपासून ‘गँग्स ऑफ वासेपूर’ ते ‘महाराणी’पर्यंतचा दमदार अभिनय
Huma Qureshi हुमा कुरेशीचा जन्म २८ जुलै १९८६ रोजी दिल्ली येथे झाला. तिचे वडील सलीम कुरेशी हे रेस्टॉरंट व्यवसायाशी संबंधित आहेत, तर आई अमीना कुरेशी गृहिणी आहेत. दिल्ली विद्यापीठातील गार्गी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यानंतर तिने प्रसिद्ध ‘अॅक्ट वन’ या नाट्यसंस्थेशी जोडून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली.

Huma Qureshi: बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) आज आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. दिल्लीत जन्मलेल्या हुमा कुरेशीने मेहनत, जिद्द आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडसह ओटीटी विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. छोट्या जाहिरातींपासून सुरू झालेला तिचा प्रवास आज यशस्वी अभिनेत्रीपर्यंत पोहोचला आहे.
हुमा कुरेशीचा जन्म २८ जुलै १९८६ रोजी दिल्ली येथे झाला. तिचे वडील सलीम कुरेशी हे रेस्टॉरंट व्यवसायाशी संबंधित आहेत, तर आई अमीना कुरेशी गृहिणी आहेत. दिल्ली विद्यापीठातील गार्गी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यानंतर तिने प्रसिद्ध ‘अॅक्ट वन’ या नाट्यसंस्थेशी जोडून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. (Huma Qureshi)
अभिनय क्षेत्रात मोठं नाव कमावण्याचं स्वप्न घेऊन हुमा २००८ मध्ये मुंबईत आली. सुरुवातीला तिला चित्रपटांमध्ये संधी मिळाली नाही. मात्र, तिने हार न मानता अनेक जाहिरातींमध्ये काम केले. आमिर खान आणि शाहरुख खान यांच्यासोबत केलेल्या जाहिरातींमुळे तिच्याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधले गेले. याच जाहिराती तिच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा ठरल्या. (Huma Qureshi)

Huma Qureshi
एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची नजर हुमा कुरेशीवर पडली. तिच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांनी तिला २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटात संधी दिली. या चित्रपटात तिने ‘मोहसीना हमीद’ ही भूमिका साकारली. तिच्या नैसर्गिक अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून कौतुक केले. या भूमिकेमुळे तिला फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम नवोदित अभिनेत्री आणि सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री या विभागांत नामांकनही मिळाले.
‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या यशानंतर हुमा कुरेशीने मागे वळून पाहिले नाही. ‘लव्ह शव ते चिकन खुराना’, ‘एक थी डायन’, ‘डेढ इश्किया’, ‘बदलापूर’, ‘जॉली एलएलबी २’ आणि ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ यांसारख्या चित्रपटांत तिने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. प्रत्येक चित्रपटात वेगळा अभिनय करण्याचा तिचा प्रयत्न प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
हिंदी चित्रपटांपुरतेच मर्यादित न राहता हुमाने इतर भाषांतील चित्रपटांमध्येही आपली छाप पाडली. तिने तमिळ चित्रपट ‘काला’ आणि ‘वलिमाई’मध्ये काम केले. मराठी चित्रपट ‘हायवे’मध्येही ती झळकली. तसेच ‘आर्मी ऑफ द डेड’ या हॉलीवूड चित्रपटातून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली अभिनय क्षमता सिद्ध केली. (Huma Qureshi)
हुमा कुरेशीच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘महाराणी’ ही वेब सीरिज. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या मालिकेत तिने ‘राणी भारती’ ही भूमिका साकारली. या भूमिकेसाठी तिने भाषाशैली, देहबोली आणि वेशभूषेवर विशेष मेहनत घेतली होती. तिच्या दमदार अभिनयाचे प्रेक्षकांसह समीक्षकांनीही भरभरून कौतुक केले. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारही मिळाला.
आज हुमा कुरेशी ही केवळ बॉलिवूड अभिनेत्री नाही, तर विविध प्रकारच्या भूमिका समर्थपणे साकारणारी एक सक्षम कलाकार म्हणून ओळखली जाते. संघर्ष, मेहनत आणि सातत्य यांच्या बळावर यश मिळवता येते, याचे ती उत्तम उदाहरण आहे. त्यामुळेच आजही तिचा प्रवास अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी मानला जातो.





