Celina Jaitly: मुलाच्या आठवणीने सेलिना जेटली भावूक; कबरीची साफसफाई करताना अश्रू अनावर
Celina Jaitly सेलिनाने तिच्या पतीवर गंभीर आरोपही केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, तिला तिच्या मुलांना भेटू दिले जात नव्हते. कोर्टाच्या आदेशानंतरही मुलांना तिच्यापासून दूर ठेवण्यात आल्याचा दावा तिने केला आहे.

Celina Jaitly: सेलिना जेटली (Celina Jaitly ) सध्या तिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळातून जात आहे. एकीकडे पती पीटर हाग यांच्यासोबतचा वाद आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे, तर दुसरीकडे मुलगा शमशेर याच्या निधनाचे दुःख तिला सतत त्रास देत आहे. नुकताच सेलिनाने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला असून तो पाहून चाहतेही भावूक झाले आहेत.
या व्हिडिओमध्ये सेलिना आपला मुलगा शमशेरच्या कबरीची साफसफाई करताना दिसत आहे. मुलाच्या आठवणींनी ती पूर्णपणे भावूक झाली आणि स्वतःला सावरू शकली नाही. व्हिडिओदरम्यान तिच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
व्हिडिओसोबत सेलिनाने एक मोठी पोस्टही लिहिली आहे. तिने सांगितले की, मागील काही आठवडे तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस ठरले आहेत. “मी एक आई आहे आणि आता माझे दुःख लपवू शकत नाही,” असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. हा व्हिडिओ शेअर करणे तिच्यासाठी सोपे नव्हते, पण आपली खरी भावना लोकांसमोर मांडायची होती, असेही तिने सांगितले.
सेलिनाने तिच्या पतीवर गंभीर आरोपही केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, तिला तिच्या मुलांना भेटू दिले जात नव्हते. कोर्टाच्या आदेशानंतरही मुलांना तिच्यापासून दूर ठेवण्यात आल्याचा दावा तिने केला आहे. ती फक्त शमशेरला भेटू शकली, पण आता त्याचाही मृत्यू झाला आहे. एका आईसाठी मुलांपासून दूर राहणे हे सर्वात मोठे दुःख असल्याचे तिने म्हटले आहे.
तिने पोस्टमध्ये सांगितले की, लग्न आणि कुटुंबासाठी तिने खूप काही सोडले. अभिनय क्षेत्रातील करिअर, स्वतःचा देश आणि कुटुंब यांच्यापासून दूर जाऊन ती पतीसोबत राहण्यासाठी दुबई, सिंगापूर आणि ऑस्ट्रिया येथे गेली होती. मात्र बदल्यात तिला फक्त मानसिक त्रास आणि दुःख मिळाल्याचा आरोप तिने केला आहे. (Celina Jaitly)
सेलिनाच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी तिला धीर दिला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या संघर्षाचे कौतुक करत तिला मजबूत राहण्याचा सल्ला दिला. तिच्या भावनिक पोस्टमुळे चाहतेही हळवे झाले असून सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आहे.





