बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’ 15 ऑगस्टला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. तर त्याचा आगामी चित्रपट वेलकम टू द जंगलच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंग सेटचे मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. वेलकम फ्रँचायझीचा हा तिसरा भाग आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त बरीच स्टार कास्ट आहे. फिरोज नाडियादवाला यांच्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या रिलीजसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अहमद खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते आणि चित्रपटाच्या टीमने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शूटिंगसाठी एक भव्य सेट तयार केला होता. स्टार्सनी शूटिंगला सुरुवातही केली होती, पण मुंबईत सततच्या मुसळधार पावसामुळे ‘वेलकम टू द जंगल’च्या सेटचं नुकसान झालं आहे. आता सेट तुटल्यानंतर ‘वेलकम टू द जंगल’चे शूटिंग थांबवण्यात आले आहे. चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू होण्यासही वेळ लागू शकतो. सेट पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत शूटिंग थांबवण्यात आल्याची पुष्टी खुद्द दिग्दर्शक अहमद खान यांनी केली आहे. दरम्यान, अक्षय कुमार व्यतिरिक्त सुनील शेट्टी, परेश रावल, रवीना टंडन, दिशा पटानी, लारा दत्ता, जॉनी लीव्हर, किकू शारदा, दलेर मेहंदी, राजपाल यादव आणि श्रेयस तळपदे यांच्यासह अनेक स्टार्स वेलकम टू द जंगलमध्ये दिसणार आहेत.