Ramayana Movie : ‘रामायण’ची ११ दिवसांत जगभरात १,३८६.५ कोटींची कमाई
भारताबाहेर या चित्रपटाचे वितरण सांभाळणाऱ्या सोनी पिक्चर्सने सुरुवातीच्या ३७ बाजारपेठांवरून आता ४३ देशांमध्ये चित्रपटाचा विस्तार केला आहे.

Ramayana Movie – दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित रामायण: राइज ऑफ अ लेजेंड या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या ११ दिवसांत जागतिक बॉक्स ऑफिसवर १४७.५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १,३८६.५ कोटी रुपये) कमावले आहेत.
चित्रपटाचे जागतिक वितरक सोनी पिक्चर्सने मंगळवारी ही अधिकृत माहिती दिली. या दमदार कामगिरीसह हा चित्रपट आतापर्यंतचा पाचवा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला जगभरात ५५.७ दशलक्ष डॉलर्स (५२३.६ कोटी रुपये) कमावले होते. दुसऱ्या वीकेंडला या चित्रपटाने ३८.१ दशलक्ष डॉलर्स (३५८.१ कोटी रुपये) गल्ला जमवला, जो पहिल्या वीकेंडच्या तुलनेत केवळ ३४ टक्क्यांनी कमी आहे.
आठवड्याच्या मधल्या दिवसांतील भक्कम कमाई, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि समीक्षकांच्या कौतुकामुळे चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे.
भारताबाहेर या चित्रपटाचे वितरण सांभाळणाऱ्या सोनी पिक्चर्सने सुरुवातीच्या ३७ बाजारपेठांवरून आता ४३ देशांमध्ये चित्रपटाचा विस्तार केला आहे. गेल्या आठवड्यात सहा नवीन देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.
हा चित्रपट १९ नोव्हेंबर रोजी ब्राझील, इटली, युक्रेन आणि हंगेरीमध्ये प्रदर्शित होणार असून २० नोव्हेंबरला पोलंडमध्ये दाखल होईल. त्यानंतर २६ नोव्हेंबरपासून अर्जेंटिना, मध्य अमेरिका, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू आणि झेकियामध्ये चित्रपट प्रदर्शित केला जाईल.
तसेच चीन, जपान आणि दक्षिण कोरियामध्येही चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी सुरू असून, त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. १३० हून अधिक देशांमध्ये आणि १७ डब भाषांमध्ये हा चित्रपट पोहोचवण्याचे निर्मात्यांचे उद्दिष्ट आहे.






