Allu Arjun: “माझ्या पत्नीच्या मृत्यूसाठी अल्लू अर्जुन जबाबदार नाही”, मृत महिलेच्या पतीची तक्रार मागे घेण्याची तयारी

Allu Arjun Arrest: – अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी त्याच्या घरातून (हैदराबाद) अटक करण्यात आली. पुष्पा-२ अभिनेता अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहासोबत घरी बसला असताना अचानक पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आणि त्याला अटक केली.
पोलिसांनी त्याला हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेले. तेथून त्याला नामपल्ली न्यायालयात (हैदराबाद) हजर करण्यात आले. पुष्पा २ या अभिनेत्याला कनिष्ठ न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. काही वेळात तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर केला. अभिनेत्याच्या अटकेनंतर आता मृत महिलेचा पती भास्कर यांचे वक्तव्य समोर आले आहे, त्यांने आपला खटला मागे घेणार असल्याचे म्हटले आहे.
అల్లు అర్జున్ ను అరెస్టు చేసిన విషయం టీవీ లో చూసి తెలుసుకున్న అవసరం అయితే కేసును ఉపసుహరించుకుంటా#AlluArjunArrest #AlluArjun pic.twitter.com/vFosUQF6Yv
— TV5 News (@tv5newsnow) December 13, 2024
पुष्पा 2 अभिनेत्याला अटक केल्यानंतर मृत महिलेच्या पतीने काय म्हटले?
4 डिसेंबरला अल्लू अर्जुन हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या स्क्रिनिंगमध्ये आपल्या चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी आला होता. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये अचानक चेंगराचेंगरी झाली, यावेळी एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर तिचा पती आणि कुटुंबीयांनी अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी न्यायालयाने अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावताच महिलेचा (रेवती) पती भास्कर यांचे म्हणणे समोर आले. काही माध्यमांच्या पत्रकारांशी बोलताना त्यांनी खटला मागे घेण्याबाबत सांगितले. भास्कर म्हणाले, “मी माझा खटला मागे घेण्यास तयार आहे. मला त्याच्या अटकेबद्दल माहिती नव्हती आणि अल्लू अर्जुनचा चेंगराचेंगरीत माझ्या पत्नीच्या मृत्यूशी काहीही संबंध नाही”.
अल्लू अर्जुनने महिलेच्या कुटुंबाला केली मदत –
रेवती नावाची ३५ वर्षीय महिला पती आणि मुलांसोबत हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये स्क्रिनिंगला आली होती. चेंगराचेंगरीत त्यांना खूप दुखापत झाली. या घटनेनंतर महिला आणि तिच्या 8 वर्षाच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टर महिलेला वाचवू शकले नाहीत.
अल्लू अर्जुनला महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याने मृत महिलेच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची मदत दिली आणि लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले होते.





