करिअरच्या शिखरावर लग्न करणाऱ्या बॉलिवुड अभिनेत्री: कुटुंब आणि कामाचा कसा साधला समतोल?

मुंबई – बॉलिवुडच्या ग्लॅमरस दुनियेत करिअरच्या शिखरावर असताना लग्न करून कुटुंबाला प्राधान्य देणाऱ्या अनेक अभिनेत्रींनी आपल्या निवडींनी चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. काहींनी कुटुंब आणि करिअर यांचा समतोल साधला, तर काहींनी अभिनयातून ब्रेक घेत कुटुंबावर लक्ष केंद्रित केले. अशा काही बॉलिवुड अभिनेत्रींच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा.
जया बच्चन: ‘गुड्डी’, ‘अभिमान’ आणि ‘जंजीर’ या चित्रपटांमुळे १९७० च्या दशकात जया बच्चन यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. १९७३ मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी विवाहानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेत कुटुंबाला प्राधान्य दिले. नंतर चरित्र भूमिकांमधून त्यांनी पुनरागमन केले. सध्या त्या समाजवादी पक्षाच्या खासदार म्हणून राजकारणात सक्रिय असून, करिअर आणि राजकारण दोन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत.
नीतू कपूर: नीतू कपूर यांनी वयाच्या २१ व्या वर्षी ऋषी कपूर यांच्याशी लग्न करून चित्रपटसृष्टीला तात्पुरता अलविदा केला. यशस्वी कारकीर्द असताना त्यांनी कुटुंबाला प्राधान्य दिले. अनेक वर्षांनंतर ‘दो दुनी चार’ आणि ‘जुगजुग जियो’ या चित्रपटांमधून त्यांनी पुनरागमन केले. आता त्या आजीच्या भूमिकेत आनंदी असून, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल साधत आहेत.
भाग्यश्री: ‘मैने प्यार किया’ चित्रपटाने भाग्यश्री रातोरात स्टार झाली. मात्र, वयाच्या १९ व्या वर्षी हिमालय दासानी यांच्याशी लग्न करून तिने बॉलिवुडला रामराम ठोकला. चाहत्यांसाठी हा धक्का होता. नंतर तिने काही चित्रपट आणि टेलिव्हिजनवर काम केले. सध्या ती इन्स्टाग्रामवर व्यायाम आणि आहाराविषयी मार्गदर्शन करत आहे.
माधुरी दीक्षित: ‘तेजाब’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके हैं कौन’ यांसारख्या चित्रपटांनी माधुरी दीक्षितने चाहतावर्ग निर्माण केला. १९९९ मध्ये करिअरच्या शिखरावर असताना तिने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. भारतात परतल्यानंतर तिने ‘आजा नचले’सारख्या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून काम केले आणि ओटीटी मालिकांमधूनही ती प्रेक्षकांसमोर झळकली.
ऐश्वर्या राय-बच्चन: २००७ मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न करताना ऐश्वर्या राय तिच्या करिअरच्या शिखरावर होती. ‘धूम-२’, ‘गुरू’, ‘जोधा अकबर’ यांसारख्या चित्रपटांनी तिला बॉलिवुडची क्वीन बनवले होते. लग्नानंतर तिने कुटुंबावर लक्ष केंद्रित केले, परंतु काही निवडक भूमिकांमधून ती प्रेक्षकांसमोर येत राहिली.
अलिया भट: ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ यांसारख्या चित्रपटांनी अलिया भटला प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. २०२२ मध्ये रणबीर कपूरशी लग्न केल्यानंतर तिने कुटुंब आणि करिअर यांचा समतोल साधत चित्रपटसृष्टीत सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला. मुलीचे संगोपन करत ती आजही यशस्वीपणे चित्रपटांमध्ये काम करत आहे.या अभिनेत्रींनी आपापल्या निवडींनी कुटुंब आणि करिअर यांचा समतोल साधत प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.





