महापालिकेत ‘बोगस इंजिनिअर्स’?

पुणे-पदोन्नती मिळविण्यासाठी 2015 पासून महापालिकेत बोगस अभियांत्रिकी पदव्या सादर करण्याचा प्रकार सुरू असल्याचा दावा “आम आदमी पक्षाचे’ प्रवक्ते डॉ.अभिजित मोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
2015 पासून आतापर्यंत जवळपास महापालिकेच्या 42 कर्मचाऱ्यांनी या पदव्या मिळवून पदोन्नती मिळविली असल्याचा आरोप डॉ. मोरे यांनी केला. तसेच, या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली असली तरी ही गंभीर बाब समोर आल्यानंतरही महापालिका याप्रकरणी कोणतीही चौकशी अथवा कारवाई करत नसल्याने या प्रकरणी न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशाराही डॉ. मोरे यांनी दिला.
डॉ. मोरे म्हणाले की, महापालिकेत 2015 पासून हा प्रकार सुरू आहे. या कालावधीत अनेक कर्मचाऱ्यांनी राजस्थान, आसाम, कर्नाटकमधील मुक्त विद्यापीठाच्या पदव्या पदोन्नतीसाठी दिल्या आहेत. विशेष म्हणजे अभियांत्रिकी शाखेची पदवी कधीही दूरशिक्षणाद्वारे दिली जात नाही तसेच शासकीय विभागाच्या नोकरीत ती गृहीत धरली जात नाही, असे असतानाही 2015 पासून या पदव्यांच्या आधारे पदोन्नती दिली जात आहे. या पदोन्नतीतील गोंधळ समोर येत असून त्यावर महापालिकेतील सत्ताधारी भाजप तसेच पालिका प्रशासन काहीच बोलण्यास का तयार नाही असा सवाल डॉ. मोरे यांनी केला आहे.




