नेपाळमध्ये वाहून गेलेल्या तिसऱ्या भारतीयाचा मृतदेह सापडला

काठमांडू : नेपाळमध्ये वाहून गेलेल्या दोन बसमधील पाचव्या पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे. यामध्ये नेपाळमध्ये काम करत असलेल्या ४० वर्षीय भारतीय कामगाराचाही समावेश आहे. चितवन जिल्ह्यातील नारायणघाट-मुगलिंग रस्त्यालगतच्या सिमलताल परिसरात शुक्रवारी झालेल्या भूस्खलनानंतर पाण्याच्या लोंढ्याबरोबर त्रिशूली नदीमध्ये वाहून गेलेल्या दोन बसचे अवशेष बचाव पथकाला शनिवारी रात्री उशिरा सापडले आहेत.
या दोन्ही बसमध्ये ५४ प्रवासी होते. त्यात ७ भारतीय प्रवासी देखील होते. पहिल्या भारतीय व्यक्तीचा मृतदेह घटनास्थळापासून ५० किलोमीटर अंतरावर सापडला होता. ऋषी पाल शाही असे या व्यक्तीचे नाव होते. शाही हे मूळचे बिहारच्या मोतिहारी शहरातील राजमुनुवा भागातील असून ते नेपाळमध्ये राहत आणि तेथेच नोकरी करत असत. शाही व्यतिरिक्त, संतोष ठाकूर, सुरेंद्र साह, आदित मियाँ, सुनील, शाहनवाज आलम आणि अन्सारी अशी बेपत्ता झालेल्या इतर भारतीय नागरिकांची नावे आहेत.
दुपारी बचावकर्त्यांनी पूर्व नवलपरासी जिल्ह्यातील गैंडाकोट परिसरातून आणखी दोन मृतदेह बाहेर काढले. हे दोन्ही मृत व्यक्ती नेपाळी नागरिक होते जे अपघातात बेपत्ता झाले होते. बेपत्ता झालेल्या बसमधील प्रवाशांचा शोध घेण्यासाठी नेपाळचे लष्कर आणि पोलीस दलातील ५०० सुरक्षा रक्षक, पाणबुडे शोध घेत आहेत. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी पाण्यातील ड्रोनचीही मदत घेतली जाते.




