bobby deol: बॉबी देओलचा खुलासा : “दारूमुळे आयुष्य बिघडत होतं, पण आता एक वर्षाहून अधिक काळ मी पूर्णपणे दारू सोडली आहे”

bobby deol: बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता बॉबी देओल सध्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे. मात्र एका काळात त्याचं आयुष्य आणि करिअर खूप कठीण टप्प्यातून गेलं होतं. त्या काळात तो दारूच्या आहारी गेला होता, याची कबुली त्याने दिली आहे.
बॉबी देओलने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्यावेळी त्याला काम मिळत नव्हतं आणि त्यामुळे तो हताश झाला होता. तो म्हणाला, “मी माझ्या कुटुंबासाठी काम करत होतो, पण त्यांच्या डोळ्यांत माझ्याबद्दल भीती दिसायची. मी रोज दारू प्यायचो असं नाही, पण जेव्हा प्यायचो तेव्हा माझ्या जवळच्या लोकांना खूप त्रास व्हायचा. दारू मेंदूला पूर्णपणे विचलित करते.”
त्याने पुढे सांगितलं की, एकदा त्याचा मुलगा आईला म्हणाला, “तू रोज कामावर जाते आणि बाबा मात्र घरीच बसलेले असतात.” या वाक्यामुळे त्याला खूप धक्का बसला आणि त्याने स्वतःकडे गंभीरपणे पाहायला सुरुवात केली.
बॉबी म्हणाला, “दारूमुळे मी निगेटिव्ह झालो होतो. मी इतरांना दोष द्यायचो, इतर कलाकारांचा हेवा करायचो. पण खरं म्हणजे ते लोक खूप मेहनत करत होते, म्हणून त्यांना यश मिळत होतं. दारू प्यायल्यावर तुम्ही खरं बोलता असं लोक म्हणतात, पण खरं म्हणजे तुम्ही रागातून बोलता आणि त्यामुळे तुमच्या जवळच्या लोकांना सर्वाधिक त्रास होतो.”
शेवटी बॉबी देओलने ठाम निर्णय घेत दारू सोडली. तो म्हणतो, “आता मला एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे दारू न पिता. यामुळे माझं आयुष्य खूप बदललं.”
बॉबी देओलने ‘रेस ३’ चित्रपटातून पुनरागमन केलं. त्यानंतर ‘आश्रम’ वेब सिरीजमुळे तो चर्चेत आला. पुढे ‘अॅनिमल’ चित्रपटात तो झळकला आणि आता तो ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मधून प्रेक्षकांना भेटतो आहे.





