झारखंडमधध्ये बोट बुडून दुर्घटना; 7 मुले बेपत्ता

कोडेरमा (झारखंड) – धरणाच्या पाण्यात बोट बुडून 7 मुलांसह 8 जण बेपत्ता झाले आहेत. झारखंडमधील पंचखेरो धरणाच्या पाण्यात ही दुर्घटना घडली. बेपत्ता होणाऱ्यांमध्ये 6 ते 16 वर्षे वयाच्या 7 मुलांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.
ही दुर्घटना आज दुपारच्या सुमारास घडली. गिरीदीह जिल्ह्यातील राजधनवर पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या खेतो गावची 7 मुले आणि दोन प्रौढ व्यक्ती जलसफरीसाठी एका नौकेतून गेले होते. ही बोट बुडाल्यानंतर नावाडी आणि एक प्रवासी पोहत किनाऱ्यावर पोचले, असे कोडेरमा जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी आदित्य आनंद यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
मदत आणि बचाव कार्यासाठी “एनडीआरएफ’पथक रवाना करण्यात आले आहे. याशिवाय मस्योद्योग विभागाची मोटरबोटदेखील बुडालेल्यांचा शोध घेत आहे. मात्र आतापर्यंत कोणाचाही शोध लागलेला नाही. पंचखेरो धरण गिरीदीह आणि कोडेरमा जिल्ह्यांच्या सीमेवर आहे.





