Board Result 2025 : 10वी-12वीच्या निकालाची मोठी अपडेट आली समोर, कुठे चेक कराल निकाल? पाहा….

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मधील परीक्षांचे निकाल यंदा लवकर जाहीर होणार आहेत. मंडळातील सूत्रांनुसार, बारावीचा निकाल ९ मे रोजी, तर दहावीचा निकाल १५ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी २० मे नंतर जाहीर झालेला निकाल यंदा १० दिवस आधीच विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे.
यंदा बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून घेण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, कोकण, अमरावती आणि लातूर विभागातील उत्तरपत्रिकांचे तपासणी कार्य ८ एप्रिलपर्यंत पूर्ण झाले. मंडळाने वेळेत तपासणीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने सर्व उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे जमा झाल्या आहेत.
प्रोव्हिजनल मार्कशीट कुठं तपासणार?
निकाल जाहीर झाल्यानंतर, १०वी आणि बारावीचे विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in आणि https://mahresult.nic.in/ वर त्यांची प्रोव्हिजनल मार्कशीट तपासू शकतील.
शिक्षण मंडळाने अद्याप अधिकृत तारखांची घोषणा केलेली नसली, तरी सूत्रांच्या माहितीनुसार मे महिन्यातच निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जूनमध्ये पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याने यंदा निकाल लवकर जाहीर करण्यावर मंडळाचा भर आहे.
उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक?
दहावीप्रमाणे, महाराष्ट्र बारावी (एचएससी) उत्तीर्ण होण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान ३५ % गुण मिळवावे लागतात. दोन्ही वर्गांसाठी उत्तीर्ण होण्याचे निकष सारखेच आहेत. प्रत्येक विषय १०० गुणांचा असतो, ज्यामध्ये थिरी ८० गुणांची असतो आणि प्रॅक्टिकल/इंटर्नल मूल्यांकन २० गुणांचे असते.
उत्तीर्ण होण्यासाठी १०० पैकी किमान ३५ गुण आवश्यक आहेत. म्हणजेच ८० गुणांच्या थिअरी पेपरमध्ये किमान २८ गुण मिळवणे आणि प्रॅक्टिकलमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.





