नगर (प्रतिनिधी) – नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड (जि. पुणे) शाखेत 22 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून कर्जदार कंपनीच्या संचालक मंडळासह नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी, तत्कालीन संचालक मंडळावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ व संबंधित कर्जदारांसह बँकेची कर्ज उपसमिती या घोटाळ्यास जबाबदार असल्याची फिर्याद बँकेचे प्रमुख व्यवस्थापक महादेव साळवे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
कर्जदार बबन चव्हाण, वंदना चव्हाण, यज्ञेश चव्हाण, तसेच मंजूदेवी हरिमोहन प्रसाद, रामचंद्र तांबिले, (सर्व रा. चिंचवड), अभिजित नाथा घुले, (रा. बुरुडगाव रोड, नगर) यांच्यासह बँकेच्या कर्ज उपसमितीमधील सदस्य व नगर अर्बन बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य यांच्या विरुद्ध चिंचवड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या कर्ज प्रकरणासाठी पिंपरी एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया हद्दीतील एच ब्लॉक, इंडस्ट्रीयल प्लट नं. ए 71 व ए 72 पैकीचे क्षेत्र 906.00 चौ.मी. व त्यावरील कारखाना शेड 283.97 चौ.मी. तसेच पिंपरी एमआयडीसी प्लॉट नं. आरएल 52 जी ब्लाक आकुर्डी, प्लॉट क्षेत्र 420 चौ.मी. व त्यावरील 2260 चौ. फुटावरील आरसीसी बंगला, 1183 चौ. फूट बांधकाम, या दोन मिळकती त्यांनी बँकेकडे तारण गहाणखत ठेवली होती.
याबाबत शाखेच्या व्यवस्थापकाने ही कर्ज प्रकरण फाइल मुख्य कार्यालय-अहमदनगर येथे पाठविली होती. मुख्य कार्यालयाने ही फाइल तपासणीकरिता बँकेच्या कर्ज अर्ज छाननी विभागात पाठविली होती. तारण जागेचा सर्च रिपोर्ट बँकेचे वकील ए. एल. पवार यांनी व्हेरिफाय केला. तसेच जागेचे मूल्यांकन बँकेचे व्हॅल्यूअर अभिजित नाथा घुले यांनी ठरवून व ज्यासाठी कर्ज पाहिजे आहे, त्याची शहानिशा करून उपसमिती यांनी कर्ज प्रकरणाची फाइल संचालक मंडळाच्या सभेपुढे ठेवून 26 मार्च 2018 रोजी मंजूर केली.
30 मार्च 2018 रोजी मिळकतीचे रुपये 22 कोटींचे तारण गहाणखत करून, कर्जाचे 22 कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते. कर्जाची रक्कम कर्जदार यांचे बँक खात्यात अदा होवूनही व ती कर्जदार यांनी घेवूनही आजपावेतो त्यांनी कर्जाचा एकही हफ्ता भरला नाही. त्याबाबत बँकेने त्यांना वेळोवेळी नोटिसा दिल्या होत्या. परंतु त्यांनी एकाही नोटिशीला उत्तर दिले नाही व रक्कम भरली नाही.
मात्र, नेश लिब टेक्नोरिअल व मे. इंडियन इंजिनिअरींग इंडस्ट्रिज या फर्मला कर्ज देताना तारण म्हणून गहाण ठेवलेल्या पिंपरी-पुणे येथील मिळकतीचे मूल्य हे 22 कोटी रुपये नसून, ते 1 कोटी 39 लाख 67 हजार 130 रुपये असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे बँकेच्या मुख्य कार्यालयाचे व्यवस्थापकांनी 6.50 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस केली असताना त्याकडे बँकेच्या संचालक मंडळाने हेतूपुरस्सर दुर्लक्ष करून कोणतीही शहानिशा न करता स्वतःच्या फायद्यासाठी अर्जदारांना 22 कोटी रुपये कर्ज मंजूर करून संगनमताने बँकेची अर्थिक फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी बँक बचाव कृती समितीने मागील आठवड्यात बँक प्रशासकांच्या दालनात आंदोलन केले होते. साळवे यांनी 21 जानेवारीला तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावेळी बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी बँकेचे प्रमुख व्यवस्थाप साळवे यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.