मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील ऐतिहासिक संयुक्त सभेची (BMC Election) राज्यभरात उत्सुकता लागून राहिलेली असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दगडू सकपाळ यांनी पक्ष सोडण्याचा अंतिम निर्णय घेतला असून, ठाकरे बंधूंच्या सभेच्याच दिवशी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. लालबाग-परळमधील बालेकिल्ल्यातील मोठी ताकद दगडू सकपाळ हे मुंबईतील लालबाग-परळ परिसरातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील एक प्रभावशाली नेते मानले जातात. या भागात त्यांची प्रचंड ताकद आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने उद्धव ठाकरे गटाला स्थानिक पातळीवर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रवेशाची तारीख आणि ठिकाण दगडू सकपाळ यांचा शिंदेसेनेत प्रवेश मुक्तागिरी येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात सकपाळ यांच्यासोबत त्यांचे काही जवळचे कार्यकर्ते आणि समर्थकही प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाराजीचे मूळ कारण या निर्णयामागे मुख्य कारण म्हणजे महापालिका निवडणुकीत दगडू सकपाळ यांच्या मुलीला रेश्मा सकपाळ यांना तिकीट नाकारणे. रेश्मा सकपाळ या शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २०३ मधून महापालिका उमेदवार म्हणून इच्छुक होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तिकीट नाकारले. यामुळे रेश्मा सकपाळ यांना निवडणुकीच्या रणांगणातून माघार घ्यावी लागली. या घटनेने दगडू सकपाळ प्रचंड नाराज झाले होते. माध्यमांशी बोलताना ते भावुक होऊन म्हणाले होते, “मी म्हातारा झालो. आता माझा पक्षाला उपयोग वाटत नसेल. पण तरुणपणात मी पक्षासाठी सर्वस्व पणाला लावले होते. रक्ताच्या घामाच्या कमाईने पक्षासाठी काम केले. आज माझ्या मुलीला संधी नाकारली जात आहे, हे सहन होत नाही.” शिंदेंची भेट आणि अंतिम निर्णय या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी दगडू सकपाळ यांच्या परळ येथील निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत शिंदे यांनी सकपाळ यांना पक्षात प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले होते. दगडू सकपाळ यांनी तेव्हा “विचार करून कळवतो” असे सांगितले होते. अखेर विचार करून त्यांनी ठाकरेंना “जय महाराष्ट्र” करून शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कोण आहेत दगडू सपकाळ? दगडू सपकाळ हे शिवसेनेते अतिशय निष्ठावंत नेते होते लालबाग परळ भागांत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात त्यांचे वजन होते शिवसेना पक्षाकडून ते आमदारही राहिले होते त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख जबाबदारी होती मुंबई महापालिका निवडणुकीत मुलीला उमेदवारी मिळाली, अशी त्यांची इच्छा होती परंतु उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी न दिल्याने दगडू सपकाळ नाराज झाले ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेच्या पार्श्वभूमीवर ही घटना उद्धव ठाकरे गटासाठी मोठी राजकीय झटका मानली जात आहे. विशेषतः मुंबईतील लालबाग-परळसारख्या पारंपरिक बालेकिल्ल्यातील कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे गटाला मुंबईतील स्थानिक पातळीवर आणखी बळकटी मिळण्याची शक्यता आहे. या घटनेने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, शिवसेना गटांमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.