मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी मतदारांना आणि कार्यकर्त्यांना अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. मनसेच्या कोकण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राज ठाकरे यांनी या निवडणुकीला ‘मराठी समुदायासाठीचा अखेरचा महत्त्वाचा’ लढा असे संबोधले. “हा बीएमसी निवडणुकीत जर आपण हलगर्जीपणा केला, तर मुंबई आपल्या हातातून निसटेल आणि मग हे लोक इथे मोठी उलथापालथ करतील,” अशी तीव्र चिंता त्यांनी व्यक्त केली. बनावट मतदारांवर लक्ष द्या – राज ठाकरे यांनी यावेळी मतदार यादीतील अनियमिततांवर म्हणाले, मतदारांची नोंदणी खरी आहे की बनावट, हे पाहणे आवश्यक आहे. एकिकडे मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मराठी अस्मितेवर भर देत असताना, भाजपने हिंदू ओळखीवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, मुंबईचा पुढील महापौर मराठी नव्हे, तर हिंदू असेल. दुसरीकडे, काँग्रेसने मनसेला महाविकास आघाडीत सामील करण्याबाबत नकारत्मकता दर्शवली आहे, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मराठी मते जोडण्यासाठी मनसेसोबतच्या आघाडीसाठी सकारात्मक आहे.