नेवासा – विश्व बंधुत्व दिन आणि राजयोगिनी दादी प्रकाशमनीजी यांच्या १८ व्या स्मृती दिनानिमित्त नेवासा येथील ओम शांतीनगर, प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालय परम ज्योती भवन येथे सोमवार, दि. २५ ऑगस्ट रोजी आयोजित रक्तदान शिबिरात ४२ जणांनी रक्तदान केले. या शिबिराच्या माध्यमातून हजारो जीव वाचविण्याचा संकल्प संस्थेने घेतला आहे. या प्रसंगी माउंट अबू येथील संजयजी भाई, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या पत्नी रत्नमाला लंघे, भारती कर्डक, माजी नगरसेविका निर्मला सांगळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे, संभाजीराव पवार, डॉ. विजय आवारे, डॉ. महेंद्र शेलार, डॉ. निलेश लोखंडे, मेजर रामचंद्र पाठक, बालेंद्र पोतदार, संजय ठाणगे, मुंगसे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या सुरुवातीला राजयोगिनी दादी प्रकाशमनीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. दि. २२ ते २५ ऑगस्ट या कालावधीत देशभरातील ब्रम्हाकुमारी सेवा केंद्रांवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून लाखो लिटर रक्त संकलित करून विश्व बंधुत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे, असे राजयोगिनी सरलादिदी यांनी सांगितले. रत्नमाला लंघे यांनी आपल्या भाषणात संत ज्ञानेश्वर माउलींच्या ‘हे विश्वची माझे घर’ या संदेशाचा उल्लेख करत विश्व बंधुत्व दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, “या पवित्र भूमीतून विश्व बंधुत्वाचा संदेश देण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे.” माउंट अबू येथील संजय भाईजी यांनी दादी प्रकाशमनीजी यांच्या जीवन कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. रक्तदान शिबिराचा शुभारंभ ठाकरे गट शिवसेनेचे नेते बालेंद्र पोतदार आणि डॉ. रामेश्वर काटे यांनी रक्तदान करून केला. त्यांनी ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या विश्वव्यापी कार्याचे कौतुक केले. निर्मला सांगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर राजयोगिनी वंदना दिदी आणि प्रमिला दिदी यांनी सूत्रसंचालन केले. रक्तदान शिबिर दुपारी ३ वाजेपर्यंत चालले. अहिल्यानगर येथील सुरभी हॉस्पिटलच्या रक्तपेढीला संकलित रक्त सुपूर्द करण्यात आले. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डकडे वाटचाल विश्व बंधुत्व दिनानिमित्त प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाने देशभरातील ६,००० सेवा केंद्रांवर २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. या महाअभियानातून लाखो लिटर रक्त संकलित झाले असून, हा उपक्रम गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार आहे. – राजयोगिनी वंदना दिदी (प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालय, नेवासा)