Blood Donation After Corona Vaccination : लस घेतल्यानंतर रक्तदान करण्यासाठी थांबावे लागेल ‘इतके’ दिवस

प्रभात वृत्तसेवा – भारतातील करोना रुग्णांमध्ये मध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे देशभर चिंतेचे वातावरण आहे. देशात लसीकरण मोहीम राबविली जात आहे, परंतु तरीही रुग्णसंख्या सतत वाढत आहेत. लोकांमध्ये लसीबाबत भीती आणि संभ्रम देखील स्पष्ट होते. असे दिसून आले आहे की, जेव्हापासून ही लस आली आहे तेव्हापासून लोकांनी करोनाच्या नियमांचे पालन करणे देखील थांबवले आहे.
त्याच वेळी, कोरोना लस घेतल्यानंतर आपण पाळले पाहिजे असे काही नियम आहेत. हे नियम ण पाळल्यास आणखी समस्या उद्भवू शकतात. रुग्णसंख्या वाढल्यामुळे रक्तदान आणि प्लाझ्मादान करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, लस घेतल्यानंतर रक्तदान करू शकता की नाही, हे जाणून घेणेही तितकेच आवश्यक आहे. चला तर, जाणून घेऊया.
* लस घेतल्यानंतर आपण रक्तदान करू शकता?
राष्ट्रीय रक्त संप्रेषण परिषदेने (एनबीटीसी) अलीकडेच एक आदेश जारी केला आहे की करोना लसीचा शेवटचा डोस घेतल्यानंतर 28 दिवसांपर्यंत कोणतीही व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
* आपण केवळ 28 दिवसांनंतर रक्तदान करू शकता?
खरं तर, 17 फेब्रुवारीला एनबीटीसीच्या नियामक मंडळाच्या 30 व्या बैठकीत असे म्हटले गेले होते की कोरोना लस घेतल्यानंतर एखादी व्यक्ती शेवटची डोस घेतल्यानंतर फक्त 28 दिवसांनी रक्तदान करू शकते. म्हणजेच कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीला 28 दिवस प्रतीक्षा करावी लागते. सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही दोन्ही डोस घेतल्यानंतरच रक्तदान करू शकता, म्हणजेच तुम्ही 56 दिवस रक्तदान करू शकत नाही.
* या गोष्टीपासून दूर रहा
तज्ज्ञ्यांच्या मतानुसार लसीकरणानंतर अल्कोहोलपासून दूर राहणे खूप गरजेचे आहे. कारण अल्कोहोलच्या सेवनाचा थेट प्रतिकारशक्ती आणि यकृतावर परिणाम होतो, ज्यामुळे लसीचा प्रभाव कमी होतो. म्हणूनच, ज्या लोकांनी ही लस दिली आहे, त्यांनी अल्कोहोल पिणे टाळले पाहिजे.




