पिंपरी | राष्ट्रवादीच्या केवळ पिंपरी व भोसरी मतदार संघातच घोंगडी बैठका

पिंपरी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाच्या माध्यमातून शहरातील केवळ पिंपरी व भोसरी विधानसभा मतदार संघांमध्येच घोंगडी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली असता, चिंचवड विधानसभा मतदार संघात हा उपक्रम राबविला नसल्याकडे लक्ष वेधले असता, वरिष्ठ पातळीवरून आलेल्या कार्यक्रमाची आम्ही अंमलबजावणी केली असल्याची माहिती ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विशाल जाधव यांनी दिली.
महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यातील एकूण निवडक 80 विधानसभा मतदार संघांमध्ये ’ शिव, फुले शाहू, आंबेडकरांची वारी, गावच्या पारी’ हा उपक्रम राबविण्यात आला.
29 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या उपक्रमात अखेरच्या तिसर्या टप्प्यात शहरातील पिंपरी व भोसरी विधानसभा मतदार संघांमध्ये 16 ते 19 ऑक्टोबरदरम्यान हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत या दोन्ही मतदार संघांमधील नागरिकांशी संवाद साधून पक्षाची सर्वांना न्या देण्याची भूमिका त्यांना पटवून देण्याची जबाबदारी पार पाडण्यात आली.
भोसरीकरिता अविनाश रेणके तर पिंपरीकरिता प्रकाश चव्हाण यांच्यावर वक्ते पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कालावधीत त्यांनी या मतरदार संघांमधील नागरिकांशी संवाद साधून त्यांना रषाट्रवादीची भूमिका पटवून दिली.
वास्तविक पाहता, महाविकास आघाडीमधील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला महायुतीच्या जागा वाटपात विधानसभेच्या एकूण 80 जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
तर जागा वाटपावर चर्चादेखील सुरू झालेली नसताना 29 ऑगस्टला सुरू झालेला हा उपक्रम राष्ट्रवादीच्या टप्प्यात असलेल्या 80 जागांवरच केंद्रीत करण्यात आला असल्याचे यामुळे दिसून आले.
त्यामुळे महायुतीमधील आपल्या मित्र पक्षांना याचा फायदा मिळण्याऐवजी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी केवळ 80 मतदार संघांमध्येच हा उपक्रम राबविल्याने महायुतीमधील घटक पक्षांच्या संभाव्य मतदार संघांना यामधून डावलल्याची चर्चा सुरू झाली आहे.




