पुणे जिल्ह्यात परप्रांतीयाने फुलवली काळ्या उसाची शेती

कासारीत सेंद्रीय प्रयोग : तामिळनाडूच्या ब्लॅक शुगर किंगचे उत्पादन
शिक्रापूर – कासारी (ता. शिरुर) येथे एका परप्रांतियाने चक्क तामिळनाडू येथील उत्पादित ब्लॅक शुगर किंग या काळ्या ऊसाची सेंद्रीय पद्धतीने शेती करुन अनोखा प्रयोग शिरुर तालुक्यात करीत यशस्वी केला आहे.
कासारी येथील निमगाव म्हाळुंगी रोडलगत रामसिंग चितोडिया हे काही वर्षांपूर्वी राजस्थान येथून वास्तव्यास आले आहेत. त्यांनतर त्यांनी गावामध्ये एका ठिकाणी भाडेतत्वावर शेती घेऊन आगळीवेगळी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर त्यांनी परिसरात कोठेही नसलेला तसेच आयुर्वेदिक समजल्या जाणाऱ्या तामिळनाडू ब्लॅक शुगर किंग उसाची शेती करण्याचे ठरवत थेट तमिळनाडू येथे जात उसाचे लागवडीसाठी बेणे आणले.
त्यांनी वीस गुंठे जमिनीत उसाची शेणखतात लागवड करुन नंतर पिकासाठी शेण, बेसन पीठ, गोमूत्र व दहीपासून जिवामृत बनवून पिकाला खत म्हणून वापरले. सध्या उसाची चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे. ऊस परिसरात चर्चेचा विषय बनू लागला आहे. अनेकजण सध्या शेतात भेट देऊन सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या काळ्या उसाची पाहणी करीत आहे.
काळ्या उसाचे फायदे
कासारी येथे पिकवण्यात आलेल्या काळ्या उसामुळे शरीरातील उष्णता कमी होणे, रक्त पातळ होणे, शरीरात कॅल्शियाम वाढणे यांसह आदी आयुर्वेदिक फायदे असून पुणे मुंबईसह शहरांच्या ठिकाणी बाजारपेठेत या काळ्या उसाला विशेष मागणी आहे.





