नवी मुंबईत रेशनिंगचा काळाबाजार

नवी मुंबई – करोनाच्या काळात रेशनिंगचा काळाबाजार होत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, कोविड काळात गरीबांना देण्यात येणारा रेशनिंगचा तांदूळ थेट दक्षिण आफ्रिकेला निर्यात होत असल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हा सर्व रेशनिंगचा तांदूळ कर्नाटक, हरियाणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यातून आणण्यात आला होता. आतापर्यंत नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने 270 मेट्रीक टन तांदूळ जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आठ महिन्यांत तब्बल 32 हजार 827 मेट्रीक टन तांदूळ या साऊथ आफ्रीकन देशात निर्यात करण्यात आला आहे. त्याची किंमत सुमारे 80 कोटींच्या घरात आहे. याप्रकरणी आतापर्यंत 18 आरोपी असून कर्नाटकमधून तीन जणांना नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे.
करोना काळात बायोमेट्रीक पद्धत बंद केली. तसेच करोना काळात जास्त तांदूळही वाटण्यासाठी पाठवण्यात आला होता. हा सर्व तांदूळ काळाबाजार करून महाराष्ट्रातील गोडाऊनमध्ये आणला जात होता. त्यानंतर दुसऱ्या गोणीमध्ये भरून तो आफ्रिकन देशात निर्यात केला जात होता.
नवी मुंबई पोलिसांनी प्रथम पनवेल पळस्पे येथील टेक केअर लॉजिस्टीकमधून तांदूळ जप्त केला. त्यानंतर भिवंडीमधून जय आनंद फुड कंपनी मिरांडे इंडस्ट्री, खालापूरमधून झेनिथ इम्पाक्स कंपनी आणि जय फूड प्रोडक्शन कंपनीतून तब्बल 91 लाख 12 हजार 046 रुपये किमतीचा तांदूळ जप्त केला आहे.





