Aaditya Thackeray – दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना अटक होऊ नये, म्हणून हैद्राबादवरून एक मांत्रिक आणला गेला होता असा खळबळजळक आरोप शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केल्याने खळबळ उडाली आहे. या मांत्रिकाला दोन दिवस मातोश्रीवर ठेवला, त्यानंतर पाच दिवस खोपोलीत त्यांचे जे राहण्याचे ठिकाण आहे तिथे पाच दिवस ठेवण्यात आले आणि तिथे बसून आदित्य यांना अटक होऊ नये म्हणून तांत्रिक विद्या केली हे खरे आहे की खोटे आहे? असा सवाल करत, या तांत्रिकाला उद्धवसेनेचा मुंबईतील एक खासदार घेऊन आला असा दावा त्यांनी केला. याबरोबरच ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे एकदा उद्धव ठाकरे यांना विचारून घ्या अशा शब्दात ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांनी टीका केली. मी त्याचे फोटो देईन, मी त्याचं नाव देईन, मी पुराव्यासकट बोलतो असेही रामदास कदमांनी यावेळी बोलताना सांगितले. त्यांच्यासरखी हवेत तलवार चालवत नाही: रामदास कदम यांनी या मुलाखतीमध्ये उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधवांवर देखील टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केले आहे. मी पुराव्यासकट बोलतो… बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. आम्ही भास्कर जाधव यांच्यासारखी हवेत तलवार कधीही चालवत नाही. ज्याला कावीळ झालेली असते त्याला सारे जग पिवळे दिसते, असे म्हणताना रामदास कदमांनी जाधवांना देखील लक्ष्य केले.