“ही केवळ एक नौटंकी आहे..” राहुल गांधींच्या न्याय यात्रेवर भाजप पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली – काँग्रेस नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता मणिपुर ते मुंबई अशी भारत न्याय यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. ही यात्रा १४ जानेवारी पासून सुरू होणार असून ती २० मार्च पर्यंत चालणार आहे. भारत जोडो यात्रेपेक्षा या यात्रेचे अंतर जास्त आहे. भारत जोडो यात्रा ही सुमारे ४००० किमीची होती परंतु ही नवीन भारत न्याय यात्रा ६२०० किमीची असेल. १४ राज्यांमधून ही यात्रा जाणार आहे, या यात्रेत राहुल गांधी देशाचा पुर्व, ईशान्य आणि पश्चिम भागाचा दौरा करून देशातील नागरीकांशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधीच्या यात्रेबाबत आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.
ही केवळ एक नौटंकी आहे अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते नलिन कोहली यांनी केली आहे. या यात्रेच्या नावावरूनही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की कॉंग्रेसचे नेते दरवेळी नवनवीन नावे व घोषणा प्रचाली करण्याचा प्रयत्न करतात पण त्याला काही अर्थ नसतो. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्येच लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज मोदी देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देऊन त्यांना न्याय देत आहेत असेही त्यांनी नमूद केले.
“भारत जोडो यात्रेला देशातील जनतेने नाकारले आहे, आणि आता ते न्याय हा आणखी एक शब्द वापरून पुन्हा तशीच यात्रा काढत आहेत. काँग्रेस पक्ष या नाटकांचा अवलंब करीत असला तरी त्याला देशातील जनताच उत्तर देईल,असेही भाजप प्रवक्त्याने नमूद केले. ही यात्रा म्हणजे कॉंग्रेसचे केवळ मार्केटिंग आहे असेही ते म्हणाले.
असे असेल यात्रेचे स्वरूप
कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले की देशातील सर्वच घटकांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार ते या यात्रेच्या निमीत्ताने करणार आहेत. ही यात्रा १४ जानेवारीपासून इंफाळ मणिपूरमध्ये सुरू होईल आणि २० मार्च रोजी मुंबईत समाप्त होईल. ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि शेवटी महाराष्ट्र या राज्यांमधून मार्गक्रमण करेल.एकूण १४ राज्यांतून ही यात्रा जाणार आहे. राहुल गांधी यांनी पुर्वेपासून पश्चिमेकडील भागात आपली यात्रा सुरू करावी अशी सुचना अनेक कॉंग्रेसजनांनी त्यांना दिली होती. त्यांच्या इच्छेला राहुल गांधी यांनी या निमीत्ताने मान दिला आहे असे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.





