पुणे | कोथरूडमध्ये भाजपचा गृहकलह मिटला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोथरूड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यावर ठाम असलेले भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर आणि भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांंच्यातील वाद अखेर मिटला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर चंद्रकांत पाटील यांनी बालवडकर यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर, आपण चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारात सक्रीयपणे सहभागी होणार असल्याचे बालवडकर यांनी जाहीर केले. तर, पाटील यांनीही बालवडकर यांना पेढा भरवला. बालवडकर हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छूक होते.
तसेच, त्यावरून त्यांनी जाहीर भूमिका घेत लढणारच असल्याचे जाहीर केले होते. तर, पक्षाकडून पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बालवडकर यांची घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतरही ते लढण्यावर ठाम होते.
अखेर मंगळवारी सकाळी फडणवीस यांनी बालवडकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ बालवडकर यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली. यानंतर पाटील यांनी शिवाजीनगर मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या अर्ज भरण्यास बालवडकर यांच्यासह हजेरी लावली.





