नाशिक : नाशिकच्या पालकमंत्री पदाचा पेच अजूनही कायम असला, तरी आता स्थानिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नाशकातले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भाजपने मित्रपक्षांतील मत्तब्बर नेत्यांच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या खडाजंगीनंतर भाजपने, नाशकात आक्रमक भूमिका घेताना, जोरदार इनकमिंगला चालना देण्यास सुरुवात केली आहे. दादा भुसेंमुळे पालकमंत्री पदापासून वंचित राहिलेल्या गिरीश महाजनांनी आता, भुसेंभोवतीच चक्रव्यूह टाकण्यास सुरुवात केली आहे. कुंभमेळामंत्री असलेल्या गिरीश महाजनांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी शिंदेसेनेने व राष्ट्रवादीने आपली ताकद खर्ची केली होती. आता गिरीश महाजनांनीच आक्रमक निती अवलंबताना, दोन्ही मित्रपक्षांना धक्के देण्यास सुरुवात केली आहे. सिन्नरमधून उद्धवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजेंचा काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश करुन घेतला. पाठोपाठ आता मालेगावमध्ये शिंदेसेनेचे मंत्री भुसेंविरोधात फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. मालेगावमधून भुसेंचे कट्टर विरोधक असलेल्या अपूर्व व अद्वय हिरेंना भाजपात प्रवेश दिला आहे. पुढील आठवड्यात भुसेंविरोधात अपक्ष निवडणूक लढविणारे बंडुकाका बच्छाव यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळे भुसेंचे सगळे शत्रू आपल्या गोटात ओढत महाजन यांनी आगामी काळात भुसेंना चक्रव्यूहात अडकवले आहे. भुसे भाजपचा चक्रव्यूह कसा भेदतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.