‘२०२४ मध्ये कोल्हापूरात जागा भाजपा १०० टक्के जिंकणार’ – देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झालेला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १९ हजार मतांनी विजय मिळवला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळत होती. मात्र या निवडणुकीत विजयी होण्याचे भाजपचे स्वप्न अपूर्णच राहिले. या पराभवानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,’तीन पक्ष एकत्र निवडणूक लढूनही मागील वेळी एका पक्षाला मिळाली होती तेवढीच मतं मिळाली आहेत. निवडणुकीत सहानुभूतीचा फॅक्टर चालेल याची आम्हाला कल्पना होती.’
ते पुढे म्हणाले,’आपण जर २० निवडणुका अशा काढल्या जिथे उमेदवाराचं निधन झालं आहे त्यांच्या घरचं कोणी उभं असेल आणि विशेषत: पत्नी तर त्या निवडून आल्या आहेत. ती आमची मानसिकता आहे. पण अशाही स्थितीत भाजपाला जी मतं मिळाली त्यातूम मी समाधानी आहे. २०२४ मध्ये ही जागा भाजपा १०० टक्के जिंकणार याची मला खात्री पटली आहे”





