उद्यापासून भाजप प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील 1000 लोकांना भेटणार

मुंबई – भाजपच्या देशव्यापी महाजनसंपर्क अभियानाचा प्रारंभ उद्यापासून (बुधवार) होणार आहे. महिनाभर चालणाऱ्या अभियानाच्या माध्यमातून 80 कोटी लोकांपर्यंत पोहचण्याचे टार्गेट पक्षाने समोर ठेवले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील 1 हजार ख्यातनाम व्यक्तींची भेट हे त्या अभियानाचे ठळक वैशिष्ट्य ठरणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना 31 मे ते 30 जून या कालावधीत चालणाऱ्या पक्षाच्या अभियानाची माहिती दिली. मोदी सरकारने नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याचे औचित्य साधून भाजपने संबंधित अभियान हाती घेतले आहे. देशात लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. त्या प्रत्येक मतदारसंघातील ख्यातनाम व्यक्तींची यादी भाजपने तयार केली आहे. त्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने पद्म पुरस्कार, राष्ट्रपती पदक मिळवणाऱ्यांचा समावेश आहे.
पक्षाने सुमारे 5.5 लाख ख्यातनाम व्यक्तींची यादी बनवली आहे. त्यांची भेट केंद्रीय मंत्री किंवा पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी घेतील. त्या भेटीगाठींवेळी मोदी सरकारच्या कार्याची माहिती दिली जाईल. भाजपच्या अभियानात केंद्रीय मंत्री, केंद्रीय आणि राज्य पातळीवरील पदाधिकारी असे मिळून सुमारे 227 प्रमुख नेते सहभागी होतील.





