BJP vs NCP: वाईच्या राजकारणात नवा ट्विस्ट! नितीन पाटलांविरुद्ध भाजपच्या बड्या नेत्याचे आव्हान…सहकार क्षेत्रात खळबळ
BJP vs NCP: जयकुमार गोरे आणि मदन भोसलेंच्या सूचनेनुसार अर्ज दाखल; वाई तालुक्यातील स्थानिक राजकीय समीकरणे बदलणार?

BJP vs NCP- जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वाई तालुका सोसायटी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक ननावरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तालुक्यातील सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास निवडणूक पूर्ण ताकदीने लढवून चुरशीची करण्याची भूमिका ननावरे यांनी स्पष्ट केल्याने भाजप- राष्ट्रवादी काँग्रसमधील स्थानिक समीकरणांबाबत चर्चेला उधाण आले आहे.
जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांची या मतदारसंघात उमेदवारी आहे. त्याच मतदारसंघात ननावरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. ‘पक्षाने थांबण्याचा आदेश दिला तर थांबण्याची माझी तयारी आहे. मात्र, पक्षाने निवडणूक लढविण्याचा आदेश दिल्यास ही निवडणूक अत्यंत चुरशीची करु,’ असे त्यांनी सांगितले. मतदारसंघातील अनेक मतदार संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला. सोसायटी मतदारसंघात भाजपचे पारंपरिक संख्याबळ तुलनेने मर्यादित मानले जाते.
मात्र, त्यांच्या दाव्यामुळे त्यांच्या मागे प्रत्यक्षात किती ठराव अथवा मतदारांची ताकद उभी राहणार, याची उत्सुकता आहे. स्थानिक राजकारणात आक्रमक राजकीय शैलीसाठी परिचित ननावरे यांनी यापूर्वीही नगरपालिकेच्या राजकारणात घेतलेल्या भूमिकांमुळे ते चर्चेत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असतानाही उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत त्यांनी घेतलेल्या भूमिकेची चर्चा झाली होती. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका नेमकी कोणत्या दिशेने जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मंत्री जयकुमार गोरे, मदन भोसले, धैर्यशील कदम आणि शशिकांत पिसाळ यांच्या सूचनेनुसार अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा आदेश आपल्यासाठी अंतिम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ननावरे यांचा उमेदवारी अर्ज दबावतंत्राचा भाग आहे की भाजपने सोसायटी मतदारसंघात प्रत्यक्ष लढतीची तयारी सुरू केली आहे, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.




