अकोल्यात भाजपची महाविकास आघाडीला साथ; वंचितच्या सत्तेला धक्का देत दाेन्ही सभापतीपदांची माळ गळ्यात

अकोला : अकाेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतुन सत्ताधारी वंचितला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेच्या दाेन्ही सभापतीपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पराभव झाला असून महाविकास आघाडीने बाजी मारली. महाविकासच्या दाेन्ही उमेदवारांना भाजपने मतदान केल्याने वंचितला मोठा धक्का बसला आहे.
अकाेला जिल्हा परिषदेत वंचितला या निवडणुकीत 24 मते मिळाली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 29 मते मिळाली. तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी प्रहार जनशक्ती पक्षाच्या स्फूर्ती गावंडे तर विषय समिती सभापतीपदी अपक्ष सदस्य सम्राट डाेंगरदिवे विजयी झाले. तर सर्वाधिक सदस्य संख्या असूनही पराभव झाल्याने हा निकाल सत्ताधारी वंचितसाठी धक्का मानला जात आहे.
जानेवारी 2020 मध्ये जि.प, पं.स. निवडणुका झाल्या होत्या मात्र ओबीसीच्या आरक्षणावरून सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल झाली हाेती. न्यायालयाने 4 मार्च राेजी ओबीसी-नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण 27 टक्क्यांपेक्षा जास्त हाेणार नाही,असे स्पष्ट केल्याने त्या जागाच रिक्त झाल्या हाेत्या. त्यामुळे 5 ऑक्टाेबर राेजी मतदान झाले आणि 6 ऑक्टाेबर राेजी निकालही जाहीर झाला हाेता. त्यानंतर रिक्त झालेल्या सभापतींच्या दाेन जागांसाठी काल निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.
पाेट निवडणुकीनंतर वंचितचे संख्याबळ 23 झाले आहे. शिवसेना-13 (एक सदस्या काही दिवसांपूर्वी अपात्र झाली असून, सध्या प्रकरण अंधातरित आहे) भाजप-5, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 4, प्रहार जनशक्ती पक्ष 1 व तीन अपक्ष सदस्य आहेत. त्यापैकी एका अपक्ष सम्राट डाेंगरदिवे यांनी महााविकास आघाडीकडून सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आणि भाजपने प्रहारला पाठिंबा दिल्याने महिला व बालकल्याण सभापती पद स्फूर्ती गावंडे यांच्याकडे आले असून विषय समिती सभापतीसाठी सम्राट डाेंगरदिवे अविराेध निवडून आले.
वंचित बहुजन आघाडीच्या याेगिता राेकडे व संगिता अढाऊ या दाेघींनीही महिला व बाल विकास समिती सभापतीसाठी अर्ज भरला. परिणामी विषय समिती सभापतीसाठी डाेंगरदिवे एकटेच रिंगणात राहिले. नंतर अढाऊ यांनी अर्ज मागे घेतला आणि राेकडे व प्रहारच्या स्फूर्ती गावंडे यांच्यात लढत झाली असून यापुढे जिल्हापरिषद अध्यक्ष हा महाविकास आघाडीचा राहणार असल्याचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी म्हटले आहे.





