भाजपचा महाविकास आघाडीला पाठिंबा; अकोल्यात “वंचित”ला पराभवाचा धक्का

अकोला – अकोला जिल्हा परिषदेवर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. मात्र जिल्हा परिषदेतील दोन्ही सभापतीपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पराभव करीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना भाजपने मतदान केले आहे.
या निडणुकीत वंचितला 24 तर महाविकास आघाडीला 29 मते मिळाली. तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी प्रहार जनशक्ती पक्षाच्या स्फूर्ती गावंडे तर विषय समिती सभापतीपदी अपक्ष सदस्य सम्राट डोंगरदिवे विजयी झाले.
दरम्यान सर्वाधिक सदस्य संख्या असूनही वंचितला पराभवाला सामोरं जावं लागलं. रिक्त झालेली दोन्ही सभापतीपदं आधी वंचित बहुजन आघाडीकडे होती. मात्र, यावेळी ही दोन्ही सभापतीपदं भाजपला विश्वासात घेत ‘महाविकास आघाडी’नं विरोधकांकडे खेचून आणलीत.
सभापती पदांसाठी सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीकडून संगिता अढाऊ आणि योगिता रोकडे यांना उमेदवारी देण्यात आली. तर विरोधी आघाडीकडून अपक्ष सम्राट डोंगरदिवे आणि प्रहारच्या स्फूर्ती गावंडे यांना रिंगणात उतरविण्यात आलं. विरोधी आघाडीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, प्रहार आणि दोन अपक्षांचा समावेश आहे.





