अमित शाह उद्या जम्मू-काश्मीरला भेट देणार; भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार

Jammu Kashmir Election| जम्मू -काश्मीरमधील विधानसभा निवडणूकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकारणही तापत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला.
त्यापाठोपाठ आता भाजपनेही आपल्या बड्या नेत्यांना येथे निवडणूक प्रचारात उतरवण्याची योजना आखली आहे. या मालिकेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा उद्या म्हणजेच शुक्रवारी (6 सप्टेंबर 2024) जम्मू-काश्मीरला दौऱ्यावर येणार आहेत.
जम्मू दौऱ्यात ते विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर ते आरएसएस आणि भाजप नेत्यांची बैठक घेणार आहेत. अमित शहा शनिवारी जम्मूमध्ये रॅलीही घेण्याची शक्यता आहे.
अमित शहा यांचा हा जम्मू दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जम्मूमध्ये तिकीट वाटपावरून पक्षांतर्गत जोरदार खडाजंगी सुरू आहे. अनेक बड्या नेत्यांनी तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. अशा स्थितीत अमित शहा या दौऱ्यात स्थानिक नेत्यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करू शकतात, असे मानले जात आहे.
जाहीरनाम्यातबाबत कोणत्या अपेक्षा ?
भाजपच्या जाहीरनाम्यात काश्मिरी पंडितांच्या परतीसाठी ठोस योजना प्रस्तावित केल्या जाऊ शकतात आणि त्यांच्या सुरक्षिततेची खात्री देण्यासाठी ठोस पावले उचलू शकतात. भाजपच्या जाहीरनाम्यात काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनावर भर देऊ शकतात. तसेच दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. या जाहीरनाम्यात पक्षाची आगामी निवडणुकांमधील रणनीती आणि काश्मीरच्या समस्या सोडवण्याची कटिबद्धता दिसू शकते.
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये मतदान
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये 18 व 25 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. तब्बल दहा वर्षांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप जम्मू व काश्मीर या दोन्ही विभागांत मिळून 60-70 जागा लढवणार असल्याचे सांगितले जाते.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमधील 90 मतदारसंघांमध्ये 87.09 लाख मतदार असून त्यापैकी 42.6 लाख महिला आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने या निवडणुकांबाबत मोठी उत्सुकता आहे.
हेही वाचा:
रुपाली विरुद्ध रुपाली! ‘एकाच महिलेला किती पदे देणार?’; अजित पवार गटातील अंतर्गत वाद समोर





