BJP Politics : भाजपला बसणार धक्का! ‘हा’ युवा नेता नवीन पक्ष स्थापन करणार?
AIADMK मधील आमदारांच्या बंडखोरीनंतर आता भारतीय जनता पक्षाला (भाजप) (BJP Politics) देखील दक्षिण भारतात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

BJP Politics : तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून एक अतिशय मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. AIADMK मधील आमदारांच्या बंडखोरीनंतर आता भारतीय जनता पक्षाला (भाजप) (BJP Politics) देखील दक्षिण भारतात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तमिळनाडू भाजपचे (BJP Politics) माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई हे पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपमधून बाहेर पडून अण्णामलाई थेट स्वतःचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे संकेत मिळत असून, यामुळे तमिळनाडू भाजपमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
एकिकडे अण्णामलाई यांना भाजपमध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, दुसरीकडे त्यांनी पक्षाशी काडीमोड घेण्याचे संकेत दिल्याने राजकीय विश्लेषक थक्क झाले आहेत.
एका आघाडीच्या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अण्णामलाई यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर नवीन पक्षाचे चिन्ह, नाव आणि झेंड्याचे डिझाईन्स प्रचंड प्रमाणात व्हायरल केले जात आहेत. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर अण्णामलाई यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
अण्णामलाई यांच्या नाराजीची नेमकी कारणे काय?
‘त्रिभाषा सूत्रा’वरून केंद्र सरकारशी मतभेद
केंद्र सरकारने आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने देशातील शाळांसाठी लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राला अण्णामलाई यांनी जाहीर विरोध केला आहे. १५ मे २०२६ रोजी CBSE ने एका अधिसूचनेद्वारे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा अनिवार्य करण्याचे आदेश दिले.
अण्णामलाई यांनी या निर्णयाला विरोध करत, वर्ष २०२९-३० च्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना तीन भाषांऐवजी कोणत्याही दोन भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य असावे, अशी विनंती केंद्राला केली होती. यापूर्वी एप्रिल २०२६ मध्ये सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जेव्हा असाच नियम आला होता, तेव्हा त्यांनी त्याचे स्वागत केले होते; मात्र नववीसाठीच्या सक्तीमुळे ते नाराज असल्याचे समजते.
AIADMK सोबतच्या युतीला विरोध आणि अध्यक्षपदावरून उचलबांगडी
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या काळात अण्णामलाई हे भाजप आणि AIADMK च्या युतीवर कमालीचे नाराज होते. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, निवडणुकीच्या काही काळ आधीच अण्णामलाई यांना तमिळनाडू भाजपच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते आणि त्यांच्या जागी नैनार नागेंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली होती.
पद गेले तरीही अण्णामलाई यांनी विधानसभा निवडणुकीत एनडीए (NDA) उमेदवारांचा प्रचार मोठ्या उत्साहाने केला होता. मात्र, निवडणुकीत भाजपची कामगिरी अत्यंत साधारण राहिल्याने त्यांच्यातील नाराजी आणखी वाढली.
तमिळनाडूच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार?
अण्णामलाई हे तमिळनाडूच्या राजकारणातील एक तरुण, डॅशिंग आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पक्षातील अंतर्गत राजकारण आणि केंद्राच्या धोरणांवर असणारी नाराजी यामुळे ते आता स्वतंत्र वाट चोखाळण्याच्या तयारीत आहेत.
जर अण्णामलाई यांनी खरोखरच नवीन पक्षाची स्थापना केली, तर आधीच अस्थिर असलेल्या तमिळनाडूच्या राजकारणात भाजप (BJP Politics) आणि AIADMK या दोन्ही पक्षांसमोर मोठे आव्हान उभे ठाकणार हे निश्चित!






