पुणे | भाजपचे धोरण लोकशाहीसाठी घातक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भाजपने देशात भीतीचे वातावरण निर्माण करून लोकसभा निवडणुकीसाठी मते मिळविण्याचा खटाटोप सुरु ठेवलेला आहे,. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे, अशी टीका कॉंगेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केली आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. “लोकसभा निवडणूक ही विचारांची, लोकशाहीसाठी पाहिजे. देशात समृद्धता आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सत्तेच्या जोरावर सीबीआयचा राजकारणासाठी दुरुपयोग केला आहे. आगामी काळात इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करण्यालाचा अधिक प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, यातून लोकतंत्राचा नाश होण्याचीच भीती आहे,’ असे मतही सिंघवी व्यक्त केले आहे.
“संविधानात बदल करण्याएवजी ते जपण्याचा प्रयत्न असला पाहिजे. निवडणुकीत कोणीही अपशब्दांचा वापर करणे हे चुकीचे आहे. त्याचे विपरीत परिणाम होतातच. बहुमतासाठी २७२ चा आकडा लागत असताना भाजपने ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याबाबतचा दावा केला आहे. या मागे नेमका काय उद्देश आहे,’ असा प्रश्नही सिंघवी यांनी उपस्थित केला आहे.
“देशात भाजपबद्दल जनतेच्या मनात प्रचंड आक्रोश आहे. त्याचे परिणाम यावेळी पाहायला मिळतील. महाराष्ट्रातील निवडणुकांमध्येही धक्कादायक निकाल पहायला मिळणार आहेत,’ असेही सिंघवी म्हणाले. या वेळी त्यांनी इलेक्टोरल बाँडच्या विषयावरही भाष्य करत भाजपला लक्ष्य केले.





