खासदारांनी काय खाल्ले यावर भाजपवाले कॉमेंट करताहेत…सिली सोल्स – महुआ मोईत्रा

नवी दिल्ली – संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांनी संसद भवनाच्या परिसरातच 50 तासांचे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात त्यांना देण्यात आलेल्या खाद्यपदार्थावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. धरणे धरून बसलेल्या खासदारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळच तंदुरी चिकन खाल्ल्याची माहिती असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केला आहे. तर पुनावाला ही मदतीसाठी भाजपने भाड्याने आणलेली व्यक्ती असल्याचे प्रत्युत्तर तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी दिले आहे.
भाजपने मदतीसाठी भाडे देऊन माणसे बोलावली आहेत. आंदोलन करणाऱ्या खासदारांनी काय खाल्ले यावर ते कॉमेंट करत आहेत…सिली सोल्स, असे म्हणत महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही यात ओढण्याचा प्रयत्न केला. इराणी यांचे गोव्यातील कथित सिली सोल्स बार अँड कॅफे सध्या चर्चेत आहे, त्या अनुशंगाने त्यांनी हा शब्द वापरला.
दरम्यान, आंदोलकांना लक्ष्य करताना पुनावाला म्हणाले की, बातम्यांमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार खासदारांनी गांधीजींच्या पुतळ्याजवळ चिकन आणि मांस खाले. प्राण्यांची हत्या करण्यास गांधीजींचा सक्त विरोध होता. त्यामुळे हा विरोध होता, नाटक होते की पिकनिक असे आता लोक विचारत आहेत. त्यावर भाजप विरोधकांच्या एकजुटीला घाबरली आहे असा दावा तृणमूलच्या सुश्मिता देव यांनी केला.
दरम्यान, याबाबत बोलताना आणि आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर एक ज्येष्ठ विरोधी पक्ष नेते म्हणाले की भाजपची खाण्याबाबतची टीप्पणी त्यांची असहिष्णुता दर्शवते. ते म्हणाले की काही लोक दुपारच्या भोजनात रोटी खातात. आमच्याकडे फिश करी आणि भात आहे. हवे ते खाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यात चुकीचे काय आहे?





