BJP News : भाजपला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ
भारतीय जनता पक्षाच्या गोटातून (BJP News) सध्या एक मोठी राजकीय बातमी समोर येत असून पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचा दावा केला जात आहे.

BJP News : भारतीय जनता पक्षाच्या गोटातून (BJP News) सध्या एक मोठी राजकीय बातमी समोर येत असून पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचा दावा केला जात आहे. पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (ट्विटर) वरील आपल्या अधिकृत अकाउंटच्या बायोमध्ये बदल केला आहे.
बायोमधून भाजपचा उल्लेख काढला असल्याने त्यांनी पक्षाला रामराम (BJP News) ठोकल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पूनावाला यांनी आपला राजीनामा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे सोपवल्याचे सूत्रांकडून समजते, मात्र यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. ते वैयक्तिक कारणांमुळे पक्षातून बाहेर पडत असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप शहजाद पूनावाला किंवा भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत सूत्रांकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. पूनावाला यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील बायोमध्ये अजूनही त्यांचा उल्लेख ‘भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते’ असाच आहे.
दुसरीकडे, ‘एक्स’ वरून भाजपचे नाव हटवले असले तरी त्यांनी स्वतःचे वर्णन ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आजीवन समर्थक’ असेच ठेवले आहे. यामुळे त्यांनी खरोखरच भाजप सोडला आहे की केवळ आपल्या जबाबदारीतून माघार घेतली आहे, याबाबत भाजप कार्यकर्ते आणि राजकीय अभ्यासकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. पूनावाला लवकरच या विषयावर अधिकृत निवेदन जारी करून आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी अपेक्षा आहे.
शहजाद पूनावाला हे भाजपचे (BJP News) अत्यंत आक्रमक, अभ्यासू आणि स्पष्टवक्ते प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. व्यवसायाने वकील आणि नागरी हक्क कार्यकर्ते असलेल्या पूनावाला यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली होती. मात्र, २०१७ मध्ये राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवर आणि पक्षातील अंतर्गत निवडणूक प्रक्रियेतील ‘गैरप्रकारांवर’ जोरदार टीका करत त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला होता.
त्यानंतरच्या काळात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचे खंदे समर्थक बनले आणि भाजपत दाखल होऊन पक्षाची बाजू विविध व्यासपीठांवर ठामपणे मांडत राहिले. आता त्यांनी अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय क्षेत्रात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.






