नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी पुढील आठवड्यात जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भाजपने राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. यावर वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनी जोरदार पलटवार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळजवळ कामकाजाचा अर्धा वेळ देशाबाहेर घालवतात, तरीही भाजपच विरोधकांना प्रश्न विचारतो असे म्हणताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी पुढील आठवड्यामध्ये जर्मनीमध्ये भारतीय डायस्पोराशी संवाद साधल्यानंतर जर्मनीतील विविध मंत्र्यांना भेटणार आहेत. त्यांच्या दौऱ्यावर भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंटद्वारे टीका केली होती. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, राहुल गांधी हे विरोधक नसून पर्यटन करणारे नेते आहेत. बिहार विधानसभा निवडणूकीदरम्यानही ते परदेशात गेले होते. त्यानंतर ते जंगल सफारीसाठी गेले होते, अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या टीकेनंतर प्रियंका गांधी यांच्याकडून देखील आता जोरदात प्रत्युत्तर आले आहे.