Maharashtra politics : भाजप खासदार बोंडेंची CM शिंदेंवर विखारी टीका, म्हणाले “बेडूक कितीही फुगला तरी…”

मुंबई :- “बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही,’ अशा शब्दांत भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या “महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
खासदार बोंड यावेळी म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा आदरच आहे. मात्र, त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत आहेत, असे वाटते. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना मुंबई म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र वाटायचा. तसेच, एकनाथ शिंदेंना आता ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र वाटत आहे. मात्र, ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही. त्यामुळे बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही. त्यामुळे एका जाहिरातीत दावा केला म्हणून आम्हाला काहीही फरक पडत नाही.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे सर्वोत्तम नेर्तृत्व आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा सर्व भागात फडणवीसांनी प्रभावी काम केले आहे. फडणवीस हे बहुजनांसाठी काम करतात, असेही बोंडे यांनी म्हटले आहे.
संयम पाळावा – शंभुराज देसाई
खासदार बोंडेंच्या तिकट प्रतिक्रियेवर शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी मात्र संयमित प्रतिक्रिया दिली आहे. देसाई म्हणाले, मंगळवारी वृत्तपत्रांमध्ये छापून आलेली जाहीरात शिवसेनेची अधिकृत जाहिरात नव्हती. शिवसेनेने ही जाहिरात दिलेली नाही. शिवसेनेच्या एका हितचिंतकाने ती जाहीरात दिली आहे. या जाहीरातीमुळे दोन्ही पक्षात काही संभ्रम निर्माण झाला असेल तर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते चर्चेतून तो दूर करतील.
खासदार बोंडे यांची प्रतिक्रिया मी ऐकली आहे. मुख्यमंत्र्यांवर अशा शब्दांत टीका करणे योग्य नाही. आम्ही संयम पाळला आहे. त्यांच्याकडूनदेखील संयम पाळण्याची अपेक्षा आहे.





