मध्यरात्री खलबतं, फडणवीस राज ठाकरे यांची मध्यरात्री अज्ञात स्थळी भेट, अर्धा तास ‘चर्चा’

BJP-MNS Seat Sharing | लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच राज्यातील राजकारणातही सध्या वेगवेगळी समीकरणं जुळताना दिसून येतायेत. काल याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात भेट झाली. या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत येण्यावर चर्चा झाली.
राज ठाकरेंनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर एक जागा निश्चित पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाहांनी सांगितलं. तसेच, राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं? या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही, असं अमित शाह म्हणाले.
या भेटीनंतर महायुतीत मनसे येणार असल्याची चर्चा सुरु झाली. मनसेला दोन किंवा तीन जागा मिळण्याबाबत चर्चा सुरु आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल बुधवारी मध्यरात्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. ही भेट अज्ञातस्थळी झाली. सुमारे ३० ते ४५ मिनिटे दोन्ही नेते एकत्र होते. यामुळे या प्रकारबद्दल उत्सुक्ता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीवरुन मुंबईत येण्यासाठी निघाले. काल बुधवारी रात्री ११.१५ वाजता देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले.
याचवेळी राज ठाकरे शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानावरुन बाहेर पडले. दोन्ही नेते मुंबई विमानतळ ते लोअर परले दरम्यान अज्ञात स्थळी भेटले. वृत्त माध्यमांशी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११.३० ते १२.१५ दरम्यान अर्धा ते पाऊन तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर १२.३० वाजता राज ठाकरे पुन्हा शिवतीर्थावर परतले. मध्यरात्री झालेल्या या बैठकीची जोरदार चर्चा आता सुरु झाली.
हे वाचाल का ? धनंजय मुंडेंचा खास माणूस फुटला; एका ओळीचं पत्र लिहीत दिला राजीनामा; शरद पवार गटात जाणार ?





