Pravin Darekar on Anil Parab | ‘छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला’, असे विधान वक्तव्य अनिल परब यांनी केल्याने आता टीकेची झोड उठली आहे. सत्ताधाऱ्यांकडून अनिल परब यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांकडून आंदोलन करण्यात आले. अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि राज्यपालांच्या भाषणांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. त्यांनी माफी न मागितल्यास त्यांचे निलंबन करण्यात यावे, असेही दरेकर म्हणाले. काय म्हणाले होते अनिल परब? राज्यपालांवरील अभिभाषणावर बोलताना शिवसेनेचे (ठाकरे) नेते अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत केल्याने वाद निर्माण झाला. तसेच, त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणवरही निशाणा साधला होता. राज्यपालांच्या अभिभाषणात संभाजी महाराजांचा उल्लेख नाही. संभाजी महाराजांचा विचार, वारसा जर कोणी चालवला असेल तर, माझ्याकडे बघा. छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ झाला, तसा माझाही छळ झाला. त्यांचा धर्म बदलावा म्हणून छळ झाला, तर माझा पक्ष बदलण्यासाठी छळ झाला., असे वक्तव्य परब यांनी केले होते. याशिवाय, त्यांनी अभिभाषणावरही आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. अनिल परब यांच्या निलंबनाची मागणी अनिल परब यांच्या वक्तव्यावरून आता सत्ताधारी आमदारांकडून टीका केली जात आहे. त्यांच्या वक्तव्यांच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सत्ताधारी आमदारांकडून त्यांच्या माफीची मागणी केली जात आहे. अनिल परब यांनी सभागृहात नाक्यावरची भाषा वापरु नये, त्यांनी केलेले विधानं शोभणारं नाही. छत्रपती संभाजी महाराज आणि राज्यपालांच्या भाषणांचा अपमान अनिल परब यांनी केला आहे, याबाबत त्यांनी माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराच प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. यासोबतच, त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.